Saturday, May 9, 2009

तुरेवाला बुलबुल.
आपल्याकडे शहरात, गावात अतिश्य सहज दिसणाऱ्या पक्ष्यांमधे बुलबुल हा पक्षी आहे. या बुलबुलांच्या भारतात अनेक जाती आढळतात. त्यातील अगदी सर्रास घराच्या आसपास दिसणाऱ्या जाती म्हणजे रेड वेंटेड बुलबुल अथवा लालबुड्या बुलबुल आणि रेड व्हिस्कर्ड बुलबुल अथवा तुरेवाला बुलबुल. आज मात्र या तुरेवाल्या बुलबुलाचे शहारात दिसण्याचे प्रमाण खुप कमी झालेले आहे. पण थोडे गावाच्या, शहराच्या बाहेर गेलो तर खुरट्या जंगलामधे, झाडीमधे हे बुलबुल हमखास दिसतात. साधरणत: हा पक्षी ७ ईंचाएवढा आकाराने असतो. ह्या पक्ष्याचा वरचा रंग गडद तपकिरी असतो तर पोटाकडे ते शुभ्र पांढरे असतात. डोक्यावर लांब, ऐटदार काळ्या रंगाचा तुरा असतो. डोळ्याच्या मागे लाल रंगाची पिसे थोडीशी बाहेर आलेली असतात आणि म्हणूनच याचे इंग्रजीमधे नाव रेड व्हिस्कर्ड बुलबुल असते. शेपटीच्या सुरवातीस पण असाच लालसर, भगवा रंग असतो. या पक्ष्यांचे नर मादी दोघेही दिसायला सारखेस असतात पण लहान पक्ष्यांचा रंग थोडासा फिकट असतो.
या पक्ष्यांचे प्रमुख अन्न फळे, फुलांच्या कळ्या, फुलांतील मधूरस किंवा किटक असतात. खाणे मिळवण्यासाठी ते सहसा जोडीने किंवा मोठ्या थव्याने फिरतात आणि मोठ्या मोठ्याने किलबिलाट करत फळझाडांवर उतरतात. पावसाळ्यात यांचा विणीचा हंगाम असतो. नर मादी दोघेही झाडावर कमी उंचीवर, फांदीच्या बेचक्यात कपच्या आकाराचे गोलाकार घरटे विणतात. हे घरटे झाडांची मुळे, पाने यापासून बनवलेले असते आणि आतमधे पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी कापूस, कोळ्याची जाळी असे तलम अस्तर वापरले जाते. मादी साधरणत: ३ किंवा ४ अंडी घालते. ही अंडी फिकट गुलाबी रंगाची असून त्यावर गडद लाल रंगाचे ठिपके किंवा चट्टे असतात. नर मादी दोघेही अंडी उबवण्याचे आणु पिल्लांचे संगोपन करण्याचे बरोबरीने करतात. या जातीतील इतर पक्ष्यांप्रमाणेच यांची पिल्ले जन्मजात पिसेविरहीत आणि डोळे बंद असलेली असतात.
हे पक्षी अतिशय सहज दिसतात त्यामुळे सहजीकच आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. अर्थात अश्या सहज दिसणाऱ्या पक्ष्यांचे छायाचित्रण फारसे होत नाही. सध्या शहरात हे बुलबुल दिसत नसल्यामुळे यांचे छायाचित्रण काही शहरात शक्य झाले नाही. मोठ्या जंगलात गेल्यावर अर्थातच मोठी सस्तन प्राणी, गरूड अथवा खास जंगलात आढळणारे पक्षी यांच्याकडेच जास्त लक्ष दिले गेले आणि या सतत दिसणाऱ्या बुलबुलाचे छायाचित्रण राहून गेले. या वर्षी साताऱ्याजवळच्या कासच्या पुष्प पठारावर फुलांचे छायाचित्रण करायला गेलो असताना एका लहान झुडपावर पक्ष्यांचा कलकलाट ऐकू आला. थोडे जवळ जाउन निरिक्षण केल्यावर आढळले की या तुरेवाल्या बुलबुलाची जोडी तिथे बसलेली होती. त्यांचे एकंदर वागणे, डणे आणि कलकलाट ऐकून ते प्रचंड अस्वस्थ आहेत हे जाणवत होते. थोडावेळ तिथे थांबल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांचे पिल्लू घरट्यातून खाली पडले होते आणि त्यांना खालच्या झाडीत ते नीट शोधता येत नव्हते. त्या पिल्लाच्या काळजीमुळे त्यांचा जीव कावराबावरा झाला होता. इतक्यात ते पिल्लू हळूहळू छोट्या उड्या मारत वरच्या फांदीवर आले. यामुळे त्या पक्ष्यांना हायसे वाटले आणि ते त्याच्या भोवती घिरट्या घालू लागले. त्यांना आता खात्री पटली होती की त्यांचे पिल्लू व्यवस्थीत आणि सुरक्षीत आहे. पिल्लू अजून वरच्या फांदीवर जाउन विसावले आणि मग हे दोघेही पक्षी त्याला तिथे सोडून निघून गेले. नर पक्ष्याने त्याच्यासाठी एक मोठा नाकतोडा पकडून आणला आणि त्याला भरवला. असाच पौष्टीक अन्न त्यांनी अजून त्याला एक दोन दिवस भरवले तर ते सहज त्यांच्या एवढे लिलया उडायला शिकू लागेल आणि त्याच्यासुद्धा पंखात त्याच्या पालकांएवढेच बळ सहज येईल.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८

तुरेवाला सर्पगरूड.
एखाद्या दाट जंगलात गेलो की हा गरूड आपल्याला आकाशात तरळताना सहज दिसतो. अगदी दिसला जरी नाही तरी याचा जोरदार आवाज तर आपण सहज ओळखू शकतो. हा आहे तुरेवाला सर्पगरूड किंवा क्रेस्टेड सर्पंट ईगल. संथ तरळताना हा कर्कश्य ३/४ लांबलचक शिट्या मारतो. या गरूडाचा वरचा रंग गडद तपकीरी असतो. डोक्यावर डौलदार काळा तुरा असतो णि त्यावर पांढरे ठिपके असतात. सहसा ह्या तुऱ्याची पिसे मानेवर पडलेली असतात. पण आक्रमक झाल्यावर तो तुरा फुलवलेला पण दिसू शकतो. ह्याच्या पोटाकडचा रंग एकदम फिकट बदामी असतो आणि त्यावर आकर्षक पांढऱ्या गोळ्यागोळ्यांची नक्षी असते. उडताना याच्या शेपटीवर पांढरी पट्टी अगदी उठून दिसते आणि उडता उडता याला ओळखायला पण सोपी ठरते.
गरूड म्हटले की आपल्या डोळ्यासमोर जर भला मोठा, अवाढव्य पक्षी येत असेल तर ते चुक आहे. विष्णू देवाचे वाहन गरूड आहे म्हणून खरे तर आपण असा समज करून घेतला असेल. पण हा तुरेवाला सर्पगरूड जेमतेम आपल्या घारीपेक्षा थोडाफार मोठा असतो. हा गरूड भारतात सर्वत्र आढळतो आणि सहज तो एकटा किंवा जोडीने उडताना दिसतो. यांच्या विणीचा हंगाम उन्हाळ्याच्या सुरवातीस असतो आणि याची मादी एक्च एक अंडे घालते. यांचे मुख्य खाद्य म्हणजे साप, सरडे, उंदीर असते. पण प्रसंगी बेडूक, खेकडे, ल्हान पक्षी सुद्धा ते खाउ शकतात.
गरूड असल्याने अर्थातच याची शिकारी पक्ष्यात वर्गवारी केली जाते. हे पक्षी संपुर्ण मांसाहारी असतात आणि सहसा स्वत: शिकार करून हे पक्षी त्यांचे भक्ष्य पकडतात. या शिकारी पक्ष्यांच्या जाती आणि आकारसुद्धा विविध आहेत त्यामुळे ते छोटे सस्तन प्राणी, पक्षी, सरिसृप, बेडूक, खेकडे, किटक त्यांच्या खाण्यासाठी वापरतात. हे पक्षी नुसती शिकार करतात म्हणून "शिकारी" पक्षी ठरत नाहीत तर त्यांची अशी वर्गवारी करण्याची त्यांची तीन खास शारीरीक वैशिष्ट्ये आहेत. मजबूत, वक्राकार, धारदार चोच, अणुकुचीदार नख्या असलेले दणकट पंजे आणि पाय, अतिशय तिक्ष्ण, तेज नजर यामुळे ते शिकारी पक्षी म्हणून गणले जातात.
शिकारी पक्ष्यांची चोच बघितली की लगेच कळते की हे पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा काही वेगळे आणि खास आहेत. त्यांच्या चोची वक्राकार, दणकट, टोकेरी आणि धारदार असतात. खालची आणि वरची चोच एकमेकात अशी काही पकडीसारखी घट्ट बसते की भक्ष्याच्या मांसाचे लचके त्यांना सहज तोडता येतात. यांचे मजबूत पाय, दमदार तळवे आणि टोकदार वळलेल्या नख्या त्यांना एखाद्या शस्त्रासारख्या वापरता येतात. बऱ्याच शिकारी पक्ष्यांत तीन नख्या पुढे वळलेल्या असतात आणि एक नखी मागे वळलेली असते. या तळव्यांनी ते भक्ष्यावर जोरदार दाब देउ शकतात. गरूड आणि ससाणे तर ह्या तळव्यांच्या सहाय्याने भक्ष्याची मान मोडून त्याला मारण्यात पटाईत असतात. यांची नजर तिक्ष्ण असायचे कारण म्हणजे त्यांच्या बुबूळाचा मोठा आकार आणि डोळ्याचे स्नायु जे जलद "फोकस" करतात. दिवसा उडणारे शिकारी पक्षी तर वेगवेगळे रंगसुद्धा ओळखू शकतात.
वेगवान आणि संथ तरळत उडण्याच्या पद्धतीकरता हा गरूड प्रसीद्ध हे. त्यामुळे बसलेल्या स्थीतीत या गरूडाचे छायाचित्र मिळण्याकरता बरेच फिरावे लागते. जर का त्याच्यी घरटयाची जागा मिळाली तर मात्र त्याच्या सारखी संधी नाही. रणथंभोरच्या जंगलात ह्या गरूडाने नुकताच एक पक्षी मारून खाल्ला होता. आमची जीप त्या ठिकाणी थोडी उशीरा पोहोचल्यामुळे मला त्याची खाताना काही छायाचित्र मिळाली नाहीत पण तरीसुद्धा पायामधे त्या पक्ष्याची पिसे आणि मनसोक्त पोट भरलेला तो गरूड खरोखरच छान दिसत होता. दुसऱ्या छायाचित्रात जो गरूड दिसतो आहे तो चक्क पाणी प्यायला जंगलातल्या ओढ्यावर उतरला होता. एवढ्या खालच्या पातळीत असल्यामुळे आणि तो पाणी पीत दंग असल्यामुळे त्याची मनसोक्त छायाचित्रे काढता आली.
युवराज गुर्जर.


नजाकतदार अग्नीपंख.
आज जगात काही विशिष्ट्य ठिकाणी मोठ्या प्रचंड संख्येने प्राणि अथवा पक्षी रहातात अथवा त्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यामुळे ती ठिकाणे आणि तो विशिष्ट काळ निसर्गप्रेमी त्या जागी भेट द्यायला कधीच चुकवत नाहीत. या मधे वाईल्ड बिस्ट चे टांझानिया मधील सामुहिक स्थलांतर, कोस्टा रीका किंवा ओरिसाच्या किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासवांचे मोठ्या संख्येने अंडी घालायला येणे, मेक्सीको मधील मोनार्च फुलापाखरांचे स्थलांतर, ख्रिसमस बेटांवर लाल खेकड्यांचे सामुहिक संचलन अश्या कीती तरा जागा आणि प्राणी सांगता येतील. आपल्याकडेसुद्धा अश्याच काही ठिकाणी फ्लेमिंगो अथवा रोहित पक्षी असे मोठ्या संख्येने दिसतात. अर्थात त्यांची ही संख्या केनियातील नाकुरू तळे किंवा बोगोरिया तळ्यातील रोहित पक्ष्यांएवढी नसली तरी इतर पक्ष्यांच्या समुहापेक्षा नक्कीच मोठ्या पटीत असते.
फ्लेमिंगो अथवा रोहीत पक्ष्याच्या चार उपजाती जगात आढळतात. यातील "ग्रेटर फ्लेमिंगो" ही जात अमेरीका, युरोप आणि आशियात सर्वत्र आणि सहज आढळते. हे फ्लेमिंगो अतिशय देखणे, रंगीबेरंगी पाणपक्षी आहेत. हे पक्षी मोठया संख्येने एकत्र रहातात आणि उडतानासुद्धा त्यांचा मोठाच्या मोठा थवा एकदम उडतो. हे ग्रेटर फ्लेमिंगो साधारणत: चार फुट उंच सतात आणि त्यांचा रंग पांढरा, गुलाबी असतो. मात्र उडताना त्यांच्या पंखाच्या आतील गडद गुलाबी, लाल रंग आणि त्याच बरोबर चमकदार काळी पीसे यामुळे ते खुपच सुंदर दिसतात. त्यांची लांबलचक मान आणि उंचच उंच गुलाबी पाय यामुळे हा पक्षी डौलदार दिसतो. भारतात आढळणारी याची दुसरी जात म्हणजे लेसर फ्लेमिंगो. ही आकाराने लहान असते मात्र त्यांचा रंग अधिक गडद आणि उठावदार असा गुलाबी असतो. शिवाय ही गुलाबी रंगाची पखरण शरीरावर जास्त प्रमाणातसुद्धा झालेली असते. आपल्या भारतात या दोनच जाती आपल्याला बघता येतात.
यांची लांब आणि बाकदार चोच अतिशय वैशिष्टयपुर्ण असते. फ्लेमिंगो आपली मान वाकडी करून चोचीच्या वरचा भाग उलटा करून पाणथळीतील चिखलात फीरवतो. पाणी, चिखल ढवळून चोचीच्या बारक्या फटीमधून पाण्यातील अतिसुक्ष्म जीव चोचीच्या वरच्या भागात असलेल्या गाळणीतून गाळून चोचीच्या आत फक्त सुक्ष्म जीव रहातात आणि पाणी, चिखल बाहेर पडतो. हा पक्षी जरी मोठा असला तरी पाण्यात असलेल्या अतिसुक्ष्म जीव, शेवाळे यांच्यावरच त्यांची गुजराण होते. या त्यांच्या खाण्याच्या विशिष्ट सवयींमुळे त्यांचे खाण्याचे, रहाण्याचे स्थानसुद्धा विशीष्ट आणि मर्यादित असते. असे सांगीतले जाते की त्या जागेवरचे शेवाळे जेवढे चांगले, प्रथिनयुक्त तेवढा त्या रोहित पक्ष्यांचा रंग जास्त गुलाबी आणि उठावदार असतो.
हे त्यांचे खाण्याचे स्थान विशीष्ट आणि मर्यादित असते आणि त्याचप्रमाणे कायम बदलत सुद्धा असते. बहुतेक त्या जागी मिळणाऱ्या अन्नाची प्रत आणि संख्या यावर ते जागा बदलणे ठरवत असावेत. पुर्वी मुंबईच्या आसपास फक्त मुरबाड जवळच्या माळशेज घाटात हे पक्षी यायचे. नंतर त्या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची अतोनात गर्दी होऊ लागली आणि हळूहळू त्याठिकाणी हे पक्षी यायचे अजिबात बंद झाले. यानंतर मला त्यांचे अर्नाळ्याजवळील दातिवरे हे समुद्र किनाऱ्यावरचे गाव समजले. याठिकाणी जायला आधे रेल्वे मग बस आणि त्यानंतर होडीने जायचे असा बराच लांबचा आणि वेळखाउ प्रवास करायला लागायचा. त्यात जर भरतीची / ओहोटीची वेळ चुकली तर हे पक्षी समुद्रात आत लांब असायचे त्यामुळे बघायला / छायाचित्रण करायला मिळायचे नाहीत. याकारणा करता एकदा तर मी एक छोटा तंबूच समुद्रकिनाऱ्यावर ठोकून २/३ दिवस तिथे राहीलो. या वेळेस प्रथमच मला त्यांची राखी रंगाची लहान पिल्ले दिसली. त्यानंतर मी "बर्ड रिंगींग" करायला पुलिकत, श्रीहरीकोटा येथे गेलो होतो तेंव्हा तिथल्या तळ्यात असेच हजारो ग्रेटर फ्लेमिंगो बघितले. तिथल्या स्वच्छ निळ्या पाण्यात ते खुप छान दिसत होते पण आमच्यामधील अंतर फार असल्यामुळे त्यांचे छायाचित्रण काही मनासारखे झाले नाही. यानंतर माझ्या गुजराथच्या नल सरोवरला भेटी सुरु झाल्या. ३/४ फुट उथळ पण खाऱ्या तळ्यात अतिशय आत काही भागात तिथे हे रोहित दिसतात आणि छोट्या होडक्यातून तुम्हाला आत जाउन त्यांना बघावे / छायाचित्रण करावे लागते. नितळ पाण्यात, निळसर आकाशाच्या पार्श्वभुमीवर यांची खुप छान छायाचित्रे मिळतात. इथे तुम्हीसुद्धा पाण्यामधे असल्यामुळे तुम्हाळा बऱ्यापैकी त्यांच्या जवळ जाता येते आणि त्यांची सहज "टेक ऑफ" घेतानाची सुद्धा छायाचित्रे मिळतात. नुकतीच गेली काही वर्षे आतातर भर मुंबईतच शिवडी, उरण येथे हे दोनही जातीचे रोहीत मोठ्या संख्येने येतात. मात्र शिवडी किंवा माहूलच्या घाण, काळ्या, वास येणाऱ्या प्रदुषित पाण्यात त्यांना बघायला जरी मजा आली तरी छायाचित्रणात तेवढी मजा येत नाही. मागे इमारती, विजेचे खांब, ऑइल रिफायनरीजच्या पार्श्वभुमीवर यांची मिळणारी छायाचित्रे आता जर शिवडी - उरण फ्ल्यायओव्हर झाला तर अजुन किती दिवस मिळणार हा आमच्यासमोर एक मोठाच प्रश्न आहे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/


Friday, May 8, 2009

कोलांट्या मारणारा निलकंठ.
पावसाळा झाला आणि आपण जरा शहराबाहेर पडलो तर आपल्याला हा पक्षी हमखास रस्त्याच्या आजूबाजूला टेलीफोनच्या अथवा इतर तारांवर बसलेला दिसणार. गजबजलेल्या शहरात हा का दिसत नाही कोण जाणे ? पण जरा शहराची हद्द ओलांडली तर ह्याचे दर्शन नक्कीच होणार. वर्षाच्या इतर काळात हा न दिसण्याचे कारण म्हणजे हा स्थलांतरीत पक्षी आहे, पण याचे स्थलांतर स्थानीक असल्यामुळे हा पावसाळ्यानंतर लगेचच आणि अचूक येतो. आपल्या महाराष्ट्रात म्हणे हा हिमालयातून येतो. याचा आकार साधारणत: लहान कबुतराएवढा असतो आणी तो असतो पण तसाच गुबगुबीत. याची चोच काळ्या रंगाची, पोट, गळा, मान पिवळसर तर पंखांचा रंग गडद निळा आणि टोकाला काळे पट्टे असतात. एकूण काय अनेक रंगाची नजाकतदार उधळणच याच्यावर आढळते. याचे नाव जरी "निलकंठ" असले तरी ह्याचा कंठ मात्र निळा नसतो त्यामुळे याला हे नाव का पडले हे कोडेच आहे. हा पक्षी बसलेला बघण्य़ापेक्षा उडतानाच बघावा, त्याच्या पंखांच्या अश्या काही मखमली निळ्या रंगछटा दिसतात की त्याला तोड नाही.
पिकांच्या ऐन हंगामात हा उत्तरेतून आपल्याकडे मुक्कामाला येतो.हा पिकावरचे किडे मोठ्या प्रमाणावर फस्त करतो. या शिवाय सरडे, सापसुरळ्या, पाली, सापसुद्धा याला आवडतात. जमिनीवर जरा हालचाल दिसली की याने हवेतून सूर मारलाच म्हणून समजा. याच कारणाकरता शेतकरीसुद्धा त्याला आपला मित्र समजतात आणि सहसा त्याची शिकार केली जात नाही. मार्च ते जुलै हा त्यांचा विणीचा हंगाम आहे. झाडांच्या ढोलीत हा घरटी करताना आढळतो. प्रसंगी सुतार, घूबड यांनी वापरलेली आणो सोडून दिलेली घरटीसुद्धा ह्याला चालतात. या घरट्यात मादी करड्या रंगाची ४/५ अंडी घालते. अंड्यांचे आणि पिल्लांचे संगोपन दोघेही नर, मादी करतात. या काळात मादीचे मनोरंजन करण्यासाठी नर अगदी उंच जाउन, पंख पसरवून अगदी दणकन जमिनीवर आदळतो अशी कोलांटी मारतो आणि अगदी जमिनीच्या जवळ आला की सफाईने वर परत आकाशात उंच झेपावतो. अर्थातच अश्या कसरती केल्यामुळे बहुतेक मादी त्याच्याशी जोडी जमवत असावी. ह्या त्याच्या कोलांट्या उड्या मारण्यामुळेच त्यला इंग्रजीमध्ये "ईंडीयन रोलर बर्ड" असे किंवा "ब्लू जे" असेसुद्धा म्हणतात.
हा जरी आपल्याकडे गावाबाहेर आढळत असला तरी त्याचे छायाचित्रण तिथे व्यवस्थीत होत नाही, कारण एकतर तो कृत्रीम तारेवर बसलेला असतो आणि त्यातूनही जरा चाहूल लागली की तो पटकन उडून लांब जातो. माझ्या दृष्टीने तरी ह्याचे छायाचित्रण करण्यासाठी कान्हा, बांधवगड सारखे उत्तम जंगल नाही. ह्या जंगलात ते अतिशय निर्धास्तपणे रस्त्यावर, बाजूच्या फांदीवर बसलेले आढळतात. आपण जीपमधून फिरत असल्यामुळे आपलीसुधा उंची जास्त असते आणि मग यांचे छायाचित्रण सहज शक्य होते. बऱ्याच वेळेला तर आपण जीपमधून फिरताना हा अगदी जीपच्या समोर रस्त्यावर कोलांटी मारून उतरतो आणि आपला रस्ताच थांबवतो. या वेळी त्याच्या पंखावरची निळ्या रंगाची झळाळी आणि रंगसंगती एवढी मोहक असते की त्याला डावलून तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. त्यातूनही तो तिकडून उडून जवळच्याच फांदीवर जाउन बसतो आणि मग तुम्हाला त्याचे "क्लोज अप" छायाचित्र मिळून जाते. मागे एका वर्षी कान्हाच्या जंगलात त्यांच्या विणीच्या हंगामाचा सर्वोत्त्म काळ होता. कारण प्रत्येक जागी, रस्त्यांवर त्यांच्या जोड्याच दिसत होत्या. नर मादीला सरडे पकडून आणून प्रेमाने भरवत होता, काही ठिकाणी तो कोलांट्या उड्या मारत होता तर काही ठिकाणी आम्हाला चक्क त्यांचे मिलनसुद्धा बघायला मिळाले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
अबब.... पेलिकन.
आज जगात यांच्या आठ उपजाती आढळतात आणि त्यातील काही उपजाती भारतातसुद्धा सहज दिसतात. काही ठिकाणी तर त्यांचे प्रजननही होते. यातील रोझी अथवा व्हाईट पेलिकन ही अतिशय देखणी जात आहे. यांचा प्रमुख रंग पांढराशुभ्र असतो. चोच लांब, मोठी आणि पिवळीधम्मक असते आणि तिच्या टोकाला निळा रंग असतो. चोचीच्या खालची झोळी आणि पायसुद्धा पिवळे असतात. यांच्या पिल्लांचा पंखांचा रंग मात्र तपकीरी असतो. यांच्यात नर मादीपेक्षा आकाराने, वजनाने बरेच मोठे असतात. नरांची सरासरी लांबी ५ ते ६ फुट असते तर वजन असते ९ ते १५ किलो. मादी ५ फुटांएवढी लांब असून तीचे वजन अंदाजे ५ ते ९ किलो एवढे असते. त्यांच्या पंखांचा विस्तार ९ ते १० फुट असतो.
हे पेलिकन गोड्या तसेच खाऱ्या पाण्यातसुद्धा आढळतात. यांच्या मासे पकडायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. हे पक्षी आकाराने जरी अवाढव्य असले तरी त्यांचे उड्डाण अतिशय सहज, जलद आणि वेगवान असते. काही जातींना जेंव्हा वरती आकाशात उंच उडताना खाली पाण्यात मासे दिसतात तेंव्हा ते एखाद्या दगड पडल्यासारखा खाली सूर मारतात आणि त्या माश्याला बरोबर टिपतात. या पांढऱ्या पेलिकनची मासे मारायची पद्धत मात्र अगदी आपल्या कोळ्यांसारखी असते. १०/१२ पक्ष्यांचा एक थवा घोड्याच्या नालासारख्या आकारात सहज पोहत रहातात आणि सर्व जण एकाच वेळी खाली पाण्यात मान घालून मासे पकडायचा प्रयत्न करतात. यामुळे जरी एकाच्या चोचीतून मासा सटकला तरी तो दुसऱ्याच्या चोचीत सापडतोच आणि अर्धवर्तुळाकारामुळे त्या माश्यांना यांच्या तावडीतून सुटताही येत नाही. हे सगळे करताना यांच्या हालचाली एवढ्या नियंत्रीत आणि सुसंगत असतात की आपल्याला एखादी कवायतच बघत आहोत असेच वाटत रहाते आणि त्याचबरोबर त्यांच्या आपापसातील सहजीवनाचे आणि समन्वयाचेही प्रत्यंतर येते. या मासे पकडण्यासाठी त्यांना त्यांच्या चोचीच्या खालची जी झोळी असते त्याचा खुप फायदा होतो. ह्या झोळीमध्ये चक्क २० लिटर पाणी मावू शकते. यांचा आकार मोठा असल्यामुळे त्यांना दिवसभरात खाणेसुद्धा भरपुर लागते. एक पेलिकन दिवसाला सरासरी १.२ किलो मासे खातो. मासे हेच जरी त्यांचे प्रमुख खाणे असले तरी त्यांना बेडूक, खेकडे, इतर पक्ष्यांची अंडी हे सुद्धा चालते. सकाळच्या वेळात त्यांचा मासे मारण्याचा प्रमुख उद्योग असतो नंतर मात्र ते दिवसभर पाण्यावर संथपणे तरंगणे, पंख वाळवणे, पंखांची साफसफाई करणे यात वेळ घालवतात.
बऱ्याच आधी मुंबईच्या "प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम" मधे पक्षी, प्राण्यांच्या दालनात ह्या पक्ष्याच्या अवाढव्य प्रतिकृतीला बघितले होते. अक्षरश: एखाद्या लहान होडक्याएवढे याचे मोठे शरीर असते. तोपर्यंत नैसर्गिक अवस्थेमधे काही पेलिकन बघण्याचा योग आला नव्हता. नंतर मात्र त्यांना बघण्याचा योग आला तोच मुळी त्यांच्या खास विणीच्या हंगामात, त्यांच्या घरट्यांच्या जागेवरच. मोठ्या झाडांवर अनेक जोडप्यांचा संसार त्यांच्या आकाराच्या साजेश्या मोठ्या काडाकुड्यांच्या घरट्यावर थाटला होता. भलेमोठे पेलिकन त्यांच्या पिल्लांना त्यांच्या चोचीखालच्या झोळीतून मासे आणून आणून भरवत होते. त्यावेळेस माझ्याकडे कॅमेरा नसल्यामुळे त्यांचे छायाचित्रण त्यावेळी शक्य झाले नाही. त्यानंतर मात्र गुजराथच्या नलसरोवर इथे किंवा राजस्थानच्या भरतपूरला हे पक्षी अनेक वेळेला बघितले. अतिशय मोठी आणि काहीसा बोजड वाटणारा पक्षी उडतो मात्र सफाईदार आणि सहज कारण यांच्या शरीरातील हाडांत हवा असते. यावर्षी वेलावदारच्या जंगलात काळविटांचे छायाचित्रण करण्यासाठी जात असताना अगदी भावनगरच्या महामार्गावर मला चक्क रेल्वेलाईनच्या आजूबाजूला असलेल्या पाण्यावर यांचा मोठा थवा दिसला. वरून महामार्ग जात होता तर खालून थोड्या उजवीकडून रेल्वेमार्ग जात होता आणि त्याने ती पाणथळ जागा विभागली गेली होती. तरीसुद्धा त्या जागी जवळपास १५० पेलिकनचा मोठा थवा इतर पक्ष्यांच्या जोडीने स्वच्छंदपणे बागडत होता. दुपारच्या उन्हात त्यांचा पांढरा, पिवळा रंग छान चमकत होता आणि त्यामुळे छायाचित्रणात पण मजा येत होती. याच कारणासाठी मग मी वेलावदारहून परत येतानासुद्धा त्याच जागी परत भेट दिली.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
ब्राह्मणी बदक.
ह्या देखण्या बदकाला इंग्रजीमधे "रूडी शेल्डक" किंवा "ब्राम्हणी डक" असे म्हणतात. ही जात बदक, कादंब आणि हंस या वर्गात येते. या बदकाच्या नावाप्रमाणेच यांचा उठावदार लालसर, पिवळा रंग असतो आणि शेपूट काळी असते. पंखांचा उडताना काळा, पांढरा रंग दिसून त्यावर एक मखमाली झळाळदार हिरव्या रंगाचा पट्टा असतो. नर मादी दोघेही दिसायला सारखेच असले तरी मादीच्या डोक्याचा रंग जरा जास्त फिकट, पांढरट असतो आणि नराला विणीच्या हंगामात गळ्याच्या खाली एक काळी बारीक पट्टी असते. सहसा हे बदक जोडी जोडीनेच फिरताना दिसते किंवा क्वचीत त्यांचा छोटा थवा असतो. इतर बदकांपेक्षा हे आकाराने मोठे आणि उंचीने जास्त उंच असते. सर्व जगभरात ही जात आढळत असली तरी भारतात ती स्थलांतर करून येतात. एरवी कमी संख्येत असली असली तरी मागे एकदा नेपाळमधे स्थलांतराच्या वेळी त्यांच्या कित्येक हजारांचा मोठा थवा बघितल्याची नोंद आहे.
विणीच्या हंगामात मात्र ती जोडीजोडीने फिरतात आणि घरट्याच्या जागेपासून जवळच अंतरावर खाण्यासाठी नदीवर किंवा तळ्यावर आलेली आढळतात. नवलाची गोष्ट म्हणजे विणीच्या हंगामानंतर ह्या बदकांची संपुर्ण पिसे गळून जातात आणि साधारणत: ४ आठवडे ही बदके उडू शकत नाहीत. अर्थातच ह्या वेळी शत्रुंपासून त्यांना बराच धोका असतो. घरट्याकरता त्यांना झाडांच्या ढोली, कपारी, जमिनीलगतच्या भिंतीमधले खड्डे लागतात. मादी त्यात ६ ते १६ पिवळसर, पांढरी अंडी घालते आणि ही अंडी अंदाजे ३० दिवसात उबवली जातात. ही बदके मिश्राहारी असतात. त्यांना झाडपाल्याचे कोंब, बिया जश्या लागतात तसेच त्यांना शंख, शिंपले, पाण्यातील किटक, नाकतोडे, बेडूक हे सुद्धा आवडीने खाल्ले जातात.जगभरात या जातीच्या बदकांची संख्या खुप आहे त्यामुळे यांना अस्तंगत होण्याचा धोका तसा नाही, पण तरीसुद्धा यांची मांसाकरता शिकार मोठ्याप्रमाणावर होत असते. हे बदक तसे अतिशय सावध असते आणि स्वत:बरोबर इतर बदकांनासुद्धा ते मोठ्या मोठ्याने ओरडून धोक्याचा इशारा देतात. स्वभावाने ही भांडकुदळ असतात. खाण्यासाठी आणि इतर वेळीसुद्धा ती इतर बदकांच्या आसपास दादागिरीने फिरत असतात आणि आपल्या मोठ्या आवाजाने त्यांना घाबरवत असतात. त्यांचा एखादा थवा जर पाण्यात असेल तर त्यांचा आवाज अतिशय दुरवर ऐकू जातो.
महाराष्ट्रात किंवा बाहेरही ही आपल्याला हिवाळ्यात नदी, मोठे तलाव, बंधारे येथे हमखास दिसतात. यांचा रंग एवढा सुरेख आणि वेगळाच असतो की त्यांना एकदा तुम्ही बघितले की परत त्यांना तुम्ही सहज ओळखणारच. दिसायला जरी ही बदके सुंदर असली तरी छायाचित्रणासाठी मात्र कठीण आहेत. एकंदरच जलाशयाचा आकार मोठा असल्यामुळे जर ह्या व इतर बदकांचे तुम्हाला छायाचित्रण करायचे असेल तर मोठ्या पल्ल्याच्या लेन्सची गरज असते. ही बदके खुप सावध असतात त्यामुळे जर का त्यांना थोडी जरी धोक्याची अथवा आपली जाणीन झाली तर पोहत पोहत किंवा उडून ती लांब दूरवर पाण्यात जातात आणि मग छायाचित्रण काही शक्य होत नाही. नाशीक मधे नांदूर मधमेश्वर, सोलापूर जवळचे भिगवण, जायकवाडी, मायणी, भरतपूर अश्या ठिकाणी ही बदके हमखास तुम्हाला दिसणार. मागे लोणार सरोवर बघायला गेलो असताना, तलावाजवळील काठावरील दाट झाडीत आम्ही विश्रांती घेत होतो. पुर्ण तळ्याला चक्क्र उन्हात मारल्यामुळे त्याचा थकवा आम्हाला जाणवत होता. अचानक मोठ्या आवाजामुळे आमची झोपमोड झाली, बघितले तर जवळच पाण्यात ह्या बदकांचा एक थवा आपापसात मारामारी करत होता. त्यांना आमची चाहूल बोलकूल न लागल्यामुळे ती आमच्यापासून एकदम जवळ होती आणि त्यामुळे आम्हाला त्यांचे अगदी निट जवळून निरीक्षण करता आले. अर्थातच त्यावेळी कॅमेरा नसल्यामुळे त्यांचे छायाचित्रण काही शक्य झाले नाही. त्यानंतरसुद्धा या बद्कांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी बघितले पण यावेळी रणथंभोरच्या जंगलात पदम तलावात एक जोडी अतिशय काठाजवळ आणि आमच्या कॅंटरजवळ आली आणि त्यामुळे मला त्यांचे सहजासहजी छायाचित्रण करता आले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

दिमाखदार शेकाटया.
शेकाटया किंवा ब्लॅकवींग्ड स्टिल्ट हा आपल्याला सहज आपल्या शहराच्या, गावाच्या आसपास पाणवठयावर दिसणारा पक्षी आहे. फ्लेमींगो सोडले तर पाणथळीतील पक्ष्यांतील हा सर्वात लांब पायाचा पक्षी आहे. त्याचा डौलदार अविर्भाव, चमकदार काळे पंख आणि संपुर्ण पांढरेशुभ्र शरीर त्याला एकदम "सुटाबुटातला" आभास देतात. लालभडक पाय आणि त्याच रंगाचे डोळे त्याच्या दिमाखात अधिकच भर घालतात. यांचे चोच काळ्या रंगाची, धारदार, सरळ आणि टोकदार असते जी त्यांच्या शरीराला एकदम साजेशी असते.
भारतात काही ठिकाणी शेकाटया स्थानीक रहिवासी आहे तर काही ठिकाणी तो स्थलांतर करू येतो. दर हिवाळ्यात उत्तरेकडून दक्षिणेकडे ते छोटया समूहामधे उडडाण करतात आणि पाणथळ जागा, तलाव, नद्या आणि खाडीच्या परिसरामधे मुक्काम करतात. उन्हाळ्याच्या शेवटी परत एकदा ते दक्षिणेकडून उत्तरेकडे त्यांचा परतीचा प्रवास करतात. उत्तर भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्थान येथे त्यांच्या विणीच्या जागा आहेत.
शेकाटयांचे लांबलचक पाय चक्क दहा इंच लांब असतात आणि उडताना हे लांब पाय शेपटीच्या मागे सरळ असतात. त्यामुळे हा पक्षी उडतानासुद्धा ओळखणे अतिशय सोपे असते. अर्थातच ह्या त्यांच्या लांब पायांमुळे त्यांना जास्त खोल पाण्यात जाउन खाणे सहज शक्य होते आणि यामुळे इतर पक्ष्यांशी खाण्याकरता होणारी स्पर्धा कमी होते. तसेच त्यांना खाण्याकरता जास्त जागा वापरता येतात. यांची चोच लांब, सरळ आणि पातळ असल्यामुळे त्यांना पाण्यातून, चिखलातून त्यांचे खाणे मिळवणे सोपे जाते. जेंव्हा पाणी नितळ असते आणि त्यांचे खाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असते तेंव्हा हे त्वरेने त्यांची चोच पाण्यात घुसवून, लगबगीने त्यांचे खाणे खाताना आढळतात. शेकाटे सहसा समुहामधे रहातात आणि हा थवा २० ते १०० पक्ष्यांचा असू शकतो. त्यांचा विशीष्ट आवाज, पंख फडफडवण्याची पद्धत आणी मागे लांबलचक असणारे सरळ पाय यामुळे लांब अंतरावर किंवा अगदी प्रकाशाच्या विरूद्ध दिशेनेसुद्धा आपण त्यांना पटकन ओळखू शकतो. अगदी भल्या पहाटे यांची खाण्याकरता लगबग सुरू होते. पाण्यामधे एकेकटे, जोडीने किंवा अगदी थव्यानेसुद्धा हे आपली मान डावीकडे, उजवीकडे करत भक्ष्य शोधत भराभर फिरत असतात. एकेक भाग असा पिंजून काढल्यावर नवीन ठिकाणी उडून परत ते असेच घाइघाइने खाताना पाहून असे वाटते की एकतर हे भयंकर उपाशी आहेत किंवा त्यांना कुठेतरी जायची भलतीच घाई आहे. टळटळीत दुपारी मात्र ते दगडावर, काठावर आपला एक पाय दुमडून, एकाच पायावर विश्रांती घेताना आढळतात.
अगदी सहज आणि शहरातसुद्धा दिसत असल्यामुळे या पक्ष्याचे नावीन्य असे काही नाही. पण याचा डौलच असा काही न्यारा असतो की दरवेळेस कॅमेरा अगदी आपोआप उचलला जातो. तसा लाजराबुजरा स्वभाव असल्यामुळे हे पटकन छायाचित्र काढून देतील याचाही काही भरोसा नसतो. मागे उरणला पक्षीनिरीक्षण करताना आम्हाला यांची घरटयांची जागा मिळाली होती मात्र तिथे छायाचित्रण शक्य झाले नव्हते. या वेळेस नल सरोवर, गुजराथ च्या भेटीत मात्र मला यांची थोडीफार छायाचित्रे काढता आली. एका छायाचित्रात शेकाटयाचे सगळे रंग आकार सहजासहजी दिसत आहेत तर दुसऱ्यामधे "सिल्होट" प्रकारचे छायाचित्र असल्यामुळे प्रखर पार्श्वभुमीवर, सुर्योदयाच्यावेळी फक्त शेकाटयाची गडद बाह्यरेखाकृती दिसत आहे.
युवराज गुर्जर.


तुरेवाला हूप्पो.
अतिशय डौलदार, दिमाखदार, ऐटीत असणारा हा पक्षी आहे. याची प्रत्येक हालचाल, उडण्याची पद्धत, ऐट सर्व काही खास असते. ह्या पक्ष्याची नेहेमी सुतार पक्ष्याशी गल्लत केली जाते. अर्थात त्या दोघांमधे बरेचसे साम्य असते म्हणूनच ही गल्लत केली जाते, परंतु त्यांच्या तुऱ्यातील फरकाने हुप्पो पटकन लक्षात येतो. सुताराच्या डोक्यावर सहसा तांबड्या रंगाचा नुसत्या पिसांच्या पुंजक्यासारखा तुरा असतो तर हुप्पोच्या डोक्यावर लांब आणि अगदी जपानी पंख्यासारखा उघडमीट करणारा तुरा असतो. जेंव्हा हा पक्षी उत्तेजीत असतो किंवा त्याला धोका जाणवतो तेंव्हा तो हा तुरा पटकन उघडतो किंवा उडून बसतानासुद्धा त्याचा हा तुरा उघडून मग बंद होतो. हा तुरा बदामी रंगाचा असून त्याची टोके काळी असतात. ह्याच बदामी रंगाचे त्याचे शरीर असून पंखावर काळा रंग असून त्यावर पांढरे पट्टे असतात. उडताना हे काळे, पांढरे पट्टे अतिशय आकर्षक दिसतात. यांची चोच सुद्धा नाविन्यपुर्ण असते. इतर पक्ष्यांपेक्षा ही चोच जरा जास्त लांब, टोकदार आणि खाली वक्राकार असते. हे पक्षी घनदाट जंगलात न आढळता मोकळ्या, खुरट्या झाडांमधे आणि गवताळ कुरणांमधे दिसतात. पालापाचोळ्यामधे आणि जमिनीमधे दडलेले किटक आपल्या लांबलचक चोचीने शोधून शोधून काढून मटकावताना दिसतात.
ह्या पक्ष्याच्या एकंदर ९ उपजाती जगात आढळत असल्या तरी भारतात त्यातील फक्त ३ उपजाती सापडतात. अतिशय देखणा दिसत असल्यामुळे आणि आकर्षक रंगसंगती असल्यामुळे सहसा या पक्ष्याला एकदा बघितल्यावर त्याला विसरणे केवळ अशक्य असते. किटकांमधे यांना फुलपाखरांच्या अथवा इतर अळ्या जरी प्रिय असल्या तरी ते कोळी, गांडूळे, गोम इतकेच नव्हे तर सरडे, बेडूक आणि प्रसंगी सापसुद्धा खाताना आढळले आहेत. धीट भासणारा हा पक्षी अगदी माणसाच्या आसपाससुद्धा वावरायाला कचरत नाही. थोडासा धोका जाणवला तर अगदी लांब न उडता आपली फुलपाखरांसारखी पंख उघडमीट करणारी उडण्याची पद्धत अवलंबून जवळच उतरतो आणि परत जमिनीत चोच खुपसून खाणे शोधायला सुरवात करतो. याचे घरटे म्हणजे बिळात, फटीत, झाडांच्या ढोलीत असते आणि त्याकरता अतिशय कमी सामान वापरले जाते. ही घरट्याची जागा नर खास निवडतो आणि पुढे कित्येक वर्षे तीच तीच जागा परत परत वापरली जाते. मादी अंदाजे ८ ते १५ अंडी घालते आणि ती एकटीच ही अंडी उबवते. साधारणत: १५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मादी आपल्या शरीरातील खास ग्रंथीतून अतिशय घाण वासाचा द्राव स्त्रवते आणि त्या घरट्यात पसरवते. अर्थातच यामुळे बऱ्यापैकी त्या घरट्याचे संरक्षण होते. नर मात्र अगदी मोठ्या शिकारी पक्ष्यांनासुद्धा घरट्यापासून हाकून लांब पळवतो.
जंगलात हा पक्षी कमीच दिसत असल्यामुळे यांना शोधायला गवता कुरणे, खुरट्या खुडपांच्या मोकळ्या जागाच लागतात. मग तो आपल्याला अगदी शहरातसुद्धा दिसू शकतो. दिल्लीच्या लाल किल्ल्यात सुद्धा हा तिथल्या "लॉन" वर बागडताना दिसू शकतो. मी लाल किल्ल्याची छायाचित्रे काढण्यापेक्षा तीथे याचीच जास्त छायाचित्र काढली आहेत. भरतपूर, काझीरंगा, बांधवगड अश्या राष्ट्रीय उद्यानात जीथे गवताळ प्रदेश जास्त आहे तिथे हे पक्षी सहज दिसतात. दातिवरे, अर्नाळा, अलिबाग, उरण च्या समुद्र किनाऱ्याजवळच्या झाडीमधे सुद्धा हे आपल्याला दिसतात. भरतपूरच्या जंगलात मात्र आपण चालत किंवा सायकलने फिरत असल्यामुळे तिथे यांचे छायाचित्रण सहज शक्य होऊ शकते. अर्थातच त्याचे तुरूतुरू पळणे, जरा धोका जाणवला कि थोडे पुढे उडून जाउन बसणे यामुळे त्याच्या सतत मागे मागे फिरावे लागते. मागे एकदा एका सुक्या, वठलेल्या झाडावर ९ हुप्पो पक्षी मी बघीतले होते पण संध्याकाळ झाल्यामुळे प्रकाशाच्या अभावाने मला त्यांचे छायाचित्रण काही जमू शकले नाही. आज यांची इतकी छायाचित्रे काढल्यावर सुद्धा माझ्याकडे त्यांचे वैशीष्ट्य असलेल्या तुऱ्याचे फुलवलेल्या स्थीतीत छायाचित्र नाही.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

भिरभिरणारी भिंगरी.
पाकोळ्या आणि भिंगऱ्या (स्विफ्ट आणि स्वॉलो) हे हवेत लिलया उडणारे आणि कसरती करणारे पक्षी आहेत. यांचा उडण्याचा वेग आणि कसब हे खरोखरच अचंबित करणारे असते. ह्या पक्ष्यांचे प्रमुख अन्न उडते किटक असते आणि ते मिळवण्यासाठी ते हवेतल्या हवेतच त्यांची शिताफीने शिकार करतात. ह्या पक्ष्यांची चोच जर आपण बारकाईने बघितली तर ती अगदीच लहान असते आणु त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की हे पक्षी उडता उडता सिकार कसे करतात ? पण जर का आपण ह्यांचे तोंड बघितले तर ते प्रचंड प्रमाणात वासले जाते त्यामुळे उडता उडता त्यांना मोठ्या प्रमाणात किटका त्यांच्या ह्या वासलेल्या तोंडात पकडता येतात. ह्यांच्या चोचीला त्यांच्या तोंडाजवळ मिशीसारखे काही उलट वळलेले केससुद्धा असतात. ह्या उलट्या केसांचा फायदा त्यांना बारीक किटक तोंडातच अडकवून ठेवण्यासाठी होतो. खास करून ह्या जातीची भिंगरी ही पाण्याजवळ आढळते आणि पाण्याच्या पृष्ठभागावर ती त्या पाण्यावर असलेल्या माश्या, डास आणि इतर किटक ह्यांचा फन्ना उडवते.
ह्या पक्ष्यांचा वावर संपुर्ण भारतभर आणि आसपासच्या देशांमधे असला तरी हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीमधे हे पक्षी दक्षिणेकडे उबदार प्रदेशात स्थलांतर करताना आढळतात. ही भिंगरी आकाराने लहान म्हणजे साधरणत: चिमणीएवढी असते. तीच्या शरीरावरचा रंग गडद चमकदार निळा असुन डोके फक्त लालसर तपकीरी असते. बाकी छाती आणि पोटाकडचा भाग हा अगदी कापसासारखा पांढरा शुभ्र असतो. त्यांना ओळखायची सर्वात महत्वाची खुण म्हणजे ह्यांच्या शेपटीला अगदी पातळ तारेसारखी दोन कडेला दोन पिसे असतात. नराला ही पिसे लांब असतात तर मादीची पिसे आखुड असतात. ह्या पिसांवरूनच त्यांना इंग्रजीमधे "वायर टेल्ड स्वॉलो" असे म्हणतात. ह्या भिंगऱ्या त्यांच्या आयुष्याचा बराच काळ आकाशात उडता उडताच घालवतात. अगदी त्यांचे खाणे आणि पाणी पिणेसुद्धा हवेतल्या हवेत उडता उडताच होते. हे पक्षी पाण्याजवळून चिखल जमा करून जवळच्या कपारीत, खोबणीत किंवा हल्ली अगदी शहरांमधे इमारतींच्या छज्ज्यांखालीसुद्धा अर्धवतुळाकार, खोलगट वाडगा बनवून त्यात सुमारे ४/५ अंडी घालतात. यांच्या काही जाती एकेकटी घरटी करतात तर काही जाती समुहाने अगदी शेकड्याने घरटी एकत्र करतात. ह्या पक्ष्यांचे पाय अगदी लहान आणि दुबळे असल्यामुळे सहसा हे जमिनीवर, फांदीवर चालतच नाहीत. अगदी घरट्यातसुद्धा पिल्लांना भरवताना जेमतेम ते ह्या पायाने घरट्याच्या भिंतीचा आधार घेउन उडता उडताच पिल्लांना अन्न भरवतात.
गेल्याच आठवड्यात ठाण्याच्या खाडीवर मुनीया पक्षी किंवा इतर काही स्थलांतरीत पक्षी आले आहेत का ? यासाठी गेलो असताना अगदी सुरवातीलाच पाण्यामधे एका फांदीवर ह्या पक्ष्यांची जोडी बसलेली आढळली. सकाळच्या कोवळ्या सुर्यप्रकाशात त्यांच्या पोटाकडचा पांढराशुभ्र भाग अतिशय छान चमकत होता एवढ्यात त्यातील लांब शेपुट असणारा नर उडून गेला आणि आम्ही हिरमुसले झालो. त्यात ती मादीसुद्धा लगेच उडून गेली. आम्ही आपले हताश होऊन पुढे जाउ या असा विचार करून कॅमेरे सरसावून निघालो. एवढ्यात ती मादी परत त्याच फांदीवर येउन बसली. ह्यावेळी ती पाठमोरी असल्यामुळे त्यांच्य पंखावरचा निळा रंग उन्हात अगदी झळाळत होत. आम्ही आमचे कॅमेरे सज्ज करून बसलो. थोड्याच वेळात नर सुद्धा परत आला आणि मला त्यांची छायाचित्रे मिळाली. मन भरत नसल्यामुळे आम्ही तिथेच रेंगाळलो. चक्क त्यांचे मोठे झालेले पिल्लू उडत त्यांच्या मधे येउन फांदीवर बसले आणि मला त्यांचा "फॅमिली फोटो" मिळाला. यामुळे एकंदरच काहीही ठरवले नसताना चक्क नशिबानेच मला ह्या डास, माश्यांवर पेस्ट कंट्रोल करणाऱ्या भिंगऱ्यांची छायाचित्र मिळून गेली.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८

मासेमार घूबड.
घूबड म्हटले की आपल्याकडे लगेचच त्याला अशुभ पक्षी म्हणून सगळे त्याचा तिरस्कार करतात. त्याच्या निशाचर सवयी आणि काहीसे भयावह वाटणारे मोठे बटबटीत डोळे यामुळे हे पक्षी जरी भितीदायक वाटत असले तरी खरे तर ते पल्या उंदरांची शिकार करत असल्यामुळे खुप फायद्याचे ठरतात. आपल्याकडे भारतात घूबडांच्या अनेक जाती आढळतात यातील काही अगदी गावात, शहरातसुद्धा दिसतात. तर काही जाती फक्त घनदाट जंगलातच आढळून येतात. अशीच एक दाट जंगलात आढळणारी जात आहे "ब्राऊन फिश आऊल". हे घूबड आकाराने मोठे असते आणि त्याचे वजनसुद्धा जास्त असते. याचा रंग मुख्यत: भुरकट तपकिरी असून पाठीवर जास्त गडद असतो तर पोटावर फिकट रंगावर गडद रंगाचे पट्टे असतात. त्यांचा गळा पांढराशुभ्र असतो आणि जेंव्हा ते घूत्कार करतात तेंव्हा हो फुललेला गळा सहज ध्यानात येतो. त्यांचे डोळे गोलाकार आणि पिवळेधम्मक असतात. त्यांना कानावर शिंगांसारखी पिसे असतात. नावाप्रमाणेच यांचे मुख्य अन्न मासे आणि बेडूक असल्यामुळे जंगलातील ओढे, पाणवठ्यांच्या आसपास ही आढळतात. हे पाण्यात माश्यांची शिकार करत असल्यामुळे त्यांचे पाय सतत ओले होतात आणि याच कारणासाठी त्यांच्या पायाच्या खालच्या भागावर पिसे नसतात. त्याच प्रमाणे त्यांना तीथे खास काटे असलेले खवले असतात यामुळे बुळबुळीत मासे त्यांच्या पकडीतून सहसा सटकून जात नाहीत.
ही जात घनदाट जंगलात जरी रहात असली तरी त्यांचे वास्तव्य पाण्याजवळच असते. यामुळे त्यांना त्यांचे खाणे पकडणे, खाणे सहज सुलभ जाते. यांचा विणीचा हंगाम उन्हाळ्याच्या गरम महिन्यात असतो कारण या काळात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना त्यांच्या पिल्लांकरता अधिकाधिक खाणे लगेच पकडता येते. यांची घरटी झाडांच्या बेचक्यामधे, गरूडांनी सोडलेल्या घरट्यात अथवा क्वचीतप्रसंगी दगडांच्या कपारीत असतात. मादी सहसा २/३ अंडी घालते आणि ती एकटीच अंदाजे ३५ दिवस ही अंडी उबवते. इतर पक्ष्यांप्रमाणेच घूबडेसुद्धा त्यांचे भक्ष्य आख्खे गिळतात. पक्ष्यांना दात नसल्यामुळे ते त्यांचे भक्ष्य चावून खाऊ शकत नाहीत. मात्र त्यांच्या तिक्ष्ण आणि धारदार चोचीमुळे ते त्यांच्या भक्ष्याचे लहान लहान तुकडे करून तसेच गिळतात. घूबडे त्यांचे खाणे खाताना मऊ मांस कठीण अश्या हाडे, काटे, नख्या यापासून वेगळे करून आधी पचवतात. हे पिसे, हाडे, काटे, केस असे सहज न पचणारे पदार्थ ते उलटून टाकतात. या त्यांच्या उलटलेल्या गोळ्यावरून घूबडांचे मुख्य अन्न आणि त्यांच्या सवयी यांचा अधिक अभ्यास तज्ञांना करता येतो.
बांधवगढ हे जंगल या घूबडांच्या दिसण्यासाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत अनेक वर्षे या घूबडाची खुपसारी छायाचित्रे या जंगालात मी घेतली आहेत. या वर्षी उन्हाळ्यात प्रथमच ह्या घूबडाचे घरटे मला सापडले. खालून झाडाच्या बेचक्यात डोकावणारी दोन पिल्ले सहज दिसायची. समोरच्याच झाडावरच्या फांदीवर नर आणि मादी बसलेले म्हणण्यापेक्षा झोपलेले असायचे. बहुदा रात्रभर या खादाड पिल्लांकरता अन्न पकडून आणून आणून त्यांना भरवताना ते बिचारे दमत असावेत. एकदा मात्र त्या घूबडाने डोळे किलकिले केले, एक मोठी जांभई दिली. यानंतर त्याने रात्रभर न पचलेल्या अन्नाचा एक मोठा गोळा उलटून टाकला. इतका वेळ त्याचे डोळे बंदच होते, मधे मधे तो एक डोळा उघडून बघायचा. यानंतर त्याने पंखांची अशी काही उघडमीट करून आळोखेपिळोखे दिले की सांगता सोय नाही. जवळपास अर्धा तास मी त्या झाडाखाली नसून शांतपणे त्यांच्या हालचाली न्याहाळत होतो. अर्थातच हे न्याहाळत असताना कॅमेरा तयार असल्यामुळे त्याच्या या विविध अवस्था मला सहज टिपता आल्या.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

गिर्रेबाज कापशी.
आपल्या गावांच्या आणि शहरांच्या आसपास दिसणारा हा एक लहानसा शिकारी पक्षी. खरतर ही घारीचीच लहानशी जात आहे. मात्र आपल्याला नेहेमीच्या काळ्या घारीत आणि हीच्यात जमिन अस्मानाचा फरक असतो. साध्या घारीपेक्षा आकाराने ही लहान म्हणजे कावळ्याएवढी असते. दिसायला अतिशय देखणी आणि दिमाखदार असणाऱ्या ह्या घारीचा मुख्य रंग पांढरा, राखाडी असतो. डोक्यावर,पोटाकडे रंग हा अगदी पांढराशुभ्र आणि कापसासारखा मऊमऊ दिसणारा असतो म्हणूनच ही "कापशी". पंखांचा आणि इतरत्र राखाडी रंग असून खांद्यावरच रंग गडद काळा असतो. याच कारणाकरता हीला "ब्लॅक वींग्ड काईट" म्हणतात. यांचे डोळे लालभडक किंवा पिवळे असतात. यांची पिल्ले मात्र काहीशी करड्या रंगाची असून त्यावर बारीक बारीक ठिपके असतात.
ही देखणी घार गावाबाहेर टेलीफोनच्या तारांवर बसलेली हमखास दिसते. दिवसा शिकार करण्याच्या हीच्या पद्धतीमुळे तीला सकाळी लवकरच शिकारीकरता बाहेर पडावे लागते. अतिशय तिक्ष्ण नजर असल्यामुळे या तारांवर बसून किंवा उंच एका फांदीवर बसून ती टेहेळणी करत असते. जमिनीवर कुठे बारकीशी हालचाल दिसली आणि तीला तीचे संभाव्य सावज आहे अशी खात्री पटली की त्वरेने त्याच्याकडे सुर मारून झेप घेते. ही तीची शिकारीची सामान्य पद्धत असली तरी तीची दुसरी पद्धत अजुनच खास असते. उंच हवेत एकाच जागी हेलीकॉप्टर सारखे "हॉवरींग" करत ती तीच्या सावजाचा अंदाज घेत रहाते. कित्येक सेकंद हवेत एकाच जागी ती पंख फडफडवत कशी उडू शकते याचेच आपल्याला नवल वाटत रहाते. या घारींच्या खाण्यात मुख्यत: उंदीर, सरडे. छोटे पक्षी आणि मोठे किटकही प्रसंगी असतात. शिकारी पक्षी असल्यामुळे अर्थातच तिक्ष्ण नजर, धारदार नख्या आणि बाकदार, अणुकुचीदार चोच यांनी तीला शिकार पकडणे आणि पकडलेली शिकार फाडून खाण्यासाठी मदत होते. अगदी वेळप्रसंगी जर त्यांना शिकार मिळाली नाही तर ते मृत प्राण्यांवर पण गुजराण करतात. मानवाने अतिक्रमण केलेल्यामुळे फायदे होणाऱ्या जातीमधील ही एक घार आहे. मानवाने अतिक्रमण केल्यामुळे त्या भागात उंदरांची संख्या भरमसाठ वाढते आणि त्यामुळे त्यांच्या शिकारीच्या आशेने ह्या घारी आपल्याला गावांच्या / शहरांच्या आसपास आता जास्त दिसू लागल्या आहेत.
विणीच्या हंगामाच्या आधी नर कापशी घार हवेतल्या हवेत कसरती करून मादीला आकर्षित करायचा प्रयत्न करतात. नंतर त्यांच्या दोघांचा एकत्र गिरक्या घेत, हवेतच कोलांट्या मारत उडण्याचा प्रोग्राम असतो. ताडा, माडाच्या उंच झाडांवर यांचे मोठे पसरट काटक्यांनी बनवलेले घरटे असते. सहसा नर घार या घरट्याकरता लागणारी सामग्री जमवाजमवीचे काम करतो. मादी तीची शक्ती अंडी घालण्यासाठी आणि पिलांना वाढवण्यासाठी साठवून ठेवते. दरवर्षी घरटे नवीन जरी बांधत असले तरी ते झाड किंवा जागा ही सहसा बदलली जात नाही. मादीने घरट्यात पांढऱ्या रंगाची ३/४ अंडी घातल्यावर पुढे अंडाजे २५ दिवस ती उबवण्याचे काम मादीच करते. नरच तीला अन्न आणुन देतो. पुढेसुद्धा अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यावर नरच मादीकरता आणि पिल्लांकरता शिकार करतो. अंड्यातून बाहेर यायची वेळ वेगवेगळी असल्यामुळे काही पिल्ले मोठी आणि जास्त आक्रमक असतात. तरीसुद्धा मादी नराने आणलेले अन्न प्रत्येक पिल्लाला मिळेल याची काळजी घेते.
अतिशय सहज दिसणारा हा शिकारी पक्षी असला तरी इतर शिकारी पक्ष्यांप्रमाणेच तो सहसा माणसापासून लांब लांब रहातो आणि त्यामुळे त्यांच्या छायाचित्रणासाठी लांब पल्ल्याची झूम लेन्स वापरावी लागते. जर त्यांच्या शिकार करण्याच्या जागा माहित असतील आणि त्या जागांच्या आसपास दबा धरून बसलो तर त्यांची अतिशय छान छायाचित्रे मिळू शकतात. आपल्या शहराच्या आसपास जरी या घारी दिसत असल्या त्यांच्या आणि आपल्यात त्या जास्त अंतर ठेवतात. यामुळे वेलावदार, भरतपूर अश्या मोठ्या अभयारण्यांमधे त्यांचे जास्त जवळून छायाचित्रण करणे शक्य होते. याशिवाय गावांच्या, शहरांच्या आसपास सहसा त्या टेलीफोनच्या तारांवरच बसले असल्याची छायाचित्रे मिळण्याची शक्यता जास्त असते, जी प्रसंगी थोडी कृत्रीम वाटतात. मात्र मोठ्या अभयारण्यात ती त्यांच्या नैसर्गिक अधिवासात असल्यामुळे तिकड्ची छायाचित्ते जास्त जिवंत वाटतात.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/