Friday, May 8, 2009

गिर्रेबाज कापशी.
आपल्या गावांच्या आणि शहरांच्या आसपास दिसणारा हा एक लहानसा शिकारी पक्षी. खरतर ही घारीचीच लहानशी जात आहे. मात्र आपल्याला नेहेमीच्या काळ्या घारीत आणि हीच्यात जमिन अस्मानाचा फरक असतो. साध्या घारीपेक्षा आकाराने ही लहान म्हणजे कावळ्याएवढी असते. दिसायला अतिशय देखणी आणि दिमाखदार असणाऱ्या ह्या घारीचा मुख्य रंग पांढरा, राखाडी असतो. डोक्यावर,पोटाकडे रंग हा अगदी पांढराशुभ्र आणि कापसासारखा मऊमऊ दिसणारा असतो म्हणूनच ही "कापशी". पंखांचा आणि इतरत्र राखाडी रंग असून खांद्यावरच रंग गडद काळा असतो. याच कारणाकरता हीला "ब्लॅक वींग्ड काईट" म्हणतात. यांचे डोळे लालभडक किंवा पिवळे असतात. यांची पिल्ले मात्र काहीशी करड्या रंगाची असून त्यावर बारीक बारीक ठिपके असतात.
ही देखणी घार गावाबाहेर टेलीफोनच्या तारांवर बसलेली हमखास दिसते. दिवसा शिकार करण्याच्या हीच्या पद्धतीमुळे तीला सकाळी लवकरच शिकारीकरता बाहेर पडावे लागते. अतिशय तिक्ष्ण नजर असल्यामुळे या तारांवर बसून किंवा उंच एका फांदीवर बसून ती टेहेळणी करत असते. जमिनीवर कुठे बारकीशी हालचाल दिसली आणि तीला तीचे संभाव्य सावज आहे अशी खात्री पटली की त्वरेने त्याच्याकडे सुर मारून झेप घेते. ही तीची शिकारीची सामान्य पद्धत असली तरी तीची दुसरी पद्धत अजुनच खास असते. उंच हवेत एकाच जागी हेलीकॉप्टर सारखे "हॉवरींग" करत ती तीच्या सावजाचा अंदाज घेत रहाते. कित्येक सेकंद हवेत एकाच जागी ती पंख फडफडवत कशी उडू शकते याचेच आपल्याला नवल वाटत रहाते. या घारींच्या खाण्यात मुख्यत: उंदीर, सरडे. छोटे पक्षी आणि मोठे किटकही प्रसंगी असतात. शिकारी पक्षी असल्यामुळे अर्थातच तिक्ष्ण नजर, धारदार नख्या आणि बाकदार, अणुकुचीदार चोच यांनी तीला शिकार पकडणे आणि पकडलेली शिकार फाडून खाण्यासाठी मदत होते. अगदी वेळप्रसंगी जर त्यांना शिकार मिळाली नाही तर ते मृत प्राण्यांवर पण गुजराण करतात. मानवाने अतिक्रमण केलेल्यामुळे फायदे होणाऱ्या जातीमधील ही एक घार आहे. मानवाने अतिक्रमण केल्यामुळे त्या भागात उंदरांची संख्या भरमसाठ वाढते आणि त्यामुळे त्यांच्या शिकारीच्या आशेने ह्या घारी आपल्याला गावांच्या / शहरांच्या आसपास आता जास्त दिसू लागल्या आहेत.
विणीच्या हंगामाच्या आधी नर कापशी घार हवेतल्या हवेत कसरती करून मादीला आकर्षित करायचा प्रयत्न करतात. नंतर त्यांच्या दोघांचा एकत्र गिरक्या घेत, हवेतच कोलांट्या मारत उडण्याचा प्रोग्राम असतो. ताडा, माडाच्या उंच झाडांवर यांचे मोठे पसरट काटक्यांनी बनवलेले घरटे असते. सहसा नर घार या घरट्याकरता लागणारी सामग्री जमवाजमवीचे काम करतो. मादी तीची शक्ती अंडी घालण्यासाठी आणि पिलांना वाढवण्यासाठी साठवून ठेवते. दरवर्षी घरटे नवीन जरी बांधत असले तरी ते झाड किंवा जागा ही सहसा बदलली जात नाही. मादीने घरट्यात पांढऱ्या रंगाची ३/४ अंडी घातल्यावर पुढे अंडाजे २५ दिवस ती उबवण्याचे काम मादीच करते. नरच तीला अन्न आणुन देतो. पुढेसुद्धा अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यावर नरच मादीकरता आणि पिल्लांकरता शिकार करतो. अंड्यातून बाहेर यायची वेळ वेगवेगळी असल्यामुळे काही पिल्ले मोठी आणि जास्त आक्रमक असतात. तरीसुद्धा मादी नराने आणलेले अन्न प्रत्येक पिल्लाला मिळेल याची काळजी घेते.
अतिशय सहज दिसणारा हा शिकारी पक्षी असला तरी इतर शिकारी पक्ष्यांप्रमाणेच तो सहसा माणसापासून लांब लांब रहातो आणि त्यामुळे त्यांच्या छायाचित्रणासाठी लांब पल्ल्याची झूम लेन्स वापरावी लागते. जर त्यांच्या शिकार करण्याच्या जागा माहित असतील आणि त्या जागांच्या आसपास दबा धरून बसलो तर त्यांची अतिशय छान छायाचित्रे मिळू शकतात. आपल्या शहराच्या आसपास जरी या घारी दिसत असल्या त्यांच्या आणि आपल्यात त्या जास्त अंतर ठेवतात. यामुळे वेलावदार, भरतपूर अश्या मोठ्या अभयारण्यांमधे त्यांचे जास्त जवळून छायाचित्रण करणे शक्य होते. याशिवाय गावांच्या, शहरांच्या आसपास सहसा त्या टेलीफोनच्या तारांवरच बसले असल्याची छायाचित्रे मिळण्याची शक्यता जास्त असते, जी प्रसंगी थोडी कृत्रीम वाटतात. मात्र मोठ्या अभयारण्यात ती त्यांच्या नैसर्गिक अधिवासात असल्यामुळे तिकड्ची छायाचित्ते जास्त जिवंत वाटतात.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

No comments:

Post a Comment