Friday, October 8, 2010

देखणी रंगीत पाखुर्डी.

आज जगभरात यांच्या १६ उपजाती आहेत, पण या सापडतात त्या फक्त आशिया आणि आफ्रीका खंडातच आढळतात. हा देखणा पक्षी सापडतो तो वाळवंटात किंवा अतिशय कोरड्या गवताळ जमीनीच्या प्रदेशात. वाळवंटात रहात असल्यामुळे र्थातच याचा रंग मुख्यत: पिवळट, राखी असतो पण त्यावर अतिशय छान नक्षी असते आणि काही जातीत इतर छान रंगाचे पट्टे, गोल, चांदवे असतात. यांचे पंख लांब आणि निमुळते असतात आणि लहानश्या पायावर सबंध पिसे असतात. ह्या रंगीत पाखुर्डीमधे नर आकाराने मादीपेक्षा थोडे मोठे असतात. त्यांच्या कपाळावर एक काळी गडद पट्टी असते. छातीवर एक आकर्षक तपकीरी रंगाची पट्टी असते, त्याच्या आत फिकट पिवळा रंग असतो आणि मग परत एक काळी पट्टी असते. पंखांवर अशीच तपकीरी, काळ्या, पांढऱ्या ठिपक्यांची नक्षी असते. मादीवर एवढी जरी रंगांची पखरण नसली तरी तीच्या पंखांवरसुद्धा काळ्या रंगाची बारीक बारीक नक्षी असते.

हे पक्षी त्यांच्य प्रचंड उडण्याकरता जगभरात प्रसिद्ध आहेत. वाळवंटी प्रदेशात रहात असल्यामुळे त्यांना पाण्याकरता लांबवर जायला लागते. यांची पाणी पिण्याची ठिकाणेसुद्धा ठरलेली असतात. ह्या पक्ष्यांच्या काही जाती दरदिवशी फक्त पाणी पिण्यासाठी अंदाजे १०० मैलांपेक्षा जास्त अंतर उडतात. त्यांचा उडण्याची वेगसुद्धा जबरदस्त असतो. ताशी ६० कि.मी. वेगाने ते आपल्या रहाण्याच्या जागेपासून ते पाण्याच्या जागेपर्यंत आणि परत उडत जातात. वाळवंटात किंवा गवताळ, रेताड प्रदेशात हे रहात असल्यामुळे यांचे रंग आजुबाजुच्या वातावरणात अगदी मिळून मिसळून जाणारे असतात. यामुळेच जर का जे पक्षी बाजुच्या गवतात शांतपणे बसलेले असतील तर बिलकूल दिसून येत नाहीत.

या पक्ष्यांना खाण्यासाठी गवताच्या बीया अथवा धान्य लागते. अगदी क्वचीत प्रसंगी ते छोटे छोटे किटकसुद्धा खातात. प्रत्येक जातीच्या त्यांच्या आवडीनुसार बीया अथवा धान्य हे ठरलेले असते आणि प्रामुख्याने ते पक्षी त्याच्या बीया शोधून त्यावर गुजराण करतात. या बीया खाण्यासाठी ते खाली पडलेल्या बीया खातात किंवा अगदी झाडावरच्या बीयासुद्धा खातात. हे पक्षी खाण्यानंतर कित्येक मैल लांब पाण्याकरता उडत जातात. पण काही काही जातीत ते ज्या भागात रहातात त्या भागात पाण्याचे एवढे दुर्भिक्ष असते की ते बरेच दिवस बिना पाण्याचेसुद्धा रहातात.

या पाखुर्ड्यांची जोडी कायमची असते आणि प्रत्येक वीणीच्या हंगामात ते इतर पक्ष्यांसारखे जोडीदार बदलत नाहीत. यांचा वीणीचा हंगाम त्या भागातला पाउस आणि त्यांच्या खाण्याच्या बियांच्या / धान्याच्या उपल्बधतेवर अवलंबून असतो. वीणीच्या हंगामात मादी जमीनीवरच, थोड्याफार खोलगट खडड्यात अंदाजे २/३ अंडी घालते. ही अंडी हिरवट रंगाची असून त्यावर चट्टे असतात जेणेकरून ती आजूबाजूच्या वातावरणात सहज मीळूमिसळून जातात. साधारणत: २२ ते २५ दिवसांच्या कालावधीत अंडी उबून त्यातून पिल्ले बाहेर येतात आणि लगेचच घरट्याच्या बाहेर पडतात. पिल्लांची काळजी दोघेही नर मादी घेतात. नर साधारणत: रात्री अंडी उबवतात तर माद्या दिवसा अंडी उबवतात. या पक्ष्यांची सर्वात खास बाब म्हणजे त्यांना स्वत:ला पाणी प्यायला तर ते दर दिवशी कित्येक अंतर उडतातच पण त्यांच्या पिल्लांना पाणी पाजण्यासाठी ते तेवढेच अंतर लांबवर उडतात, पाणी प्यायल्यावर त्यांच्या गळ्या, छातीजवळची पिसे ओली करतात आणि ते पाणी आणून त्यांच्या पिल्लांना पाजतात. ह्यांच्या नरांच्या छातीजवळची ती खास पिसे जवळपास १५/२० मि.ली. पानी सहज साठवून ठेवतात.

मागे एकदा रणथंभोरच्या जंगलात मी या रंगीत पाखुर्ड्यांची जोडी बघितली होती, पण त्यांना आमच्या जीपची चाहूल लागली आणि त्या डून लांब जाउन बसल्या. त्यामुळे फक्त दुर्बिणीतून बघण्यावरच आम्हाला समाधान मानावे लागले. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी त्याच जंगलात आमच्या पुढच्या गाडीतल्या लोकांनी सांगीतले की इथे एक रंगीत पाखुर्ड्यांची जोडी होती, ती उडून गेली पण तीची दोन पिल्ले आहेत. आम्ही जीप रस्त्याच्या बाजूला थांबवून सगळीकडे शोधले पण ती पिल्ले अशी काही दडून बसली होती की आम्हाला जाम शोधता आली नाहीत. आता या वर्षी ताडोबाच्या जंगलात माळरानावर मी रातव्याचे घरटे शोधत होतो. त्याच भागात सुमारे १२ वर्षांपुर्वी मला त्याचे घरटे आणि ३ अंडी मिळाली होती. आमची जीप त्या रस्त्यावर अतिशय हळूहळू जात असताना मला गाडीच्या डाव्या बाजूला, अगदी टायरजवळ हालचाल जाणवली म्हणून मी गाडी थांबवली तर चक्क या रंगीत पाखुर्ड्यांचे एक कुटूंबच तिथे बसले होते. नर, मादी आणि त्यांचे थोडेसे मोठे झालेले पिल्लू तिकडे जमिनीवर गवताच्या बिया टिपायला बसले होते. आमची गाडी थांबल्यामुळे त्यांना आमची चाहूल लागली, त्यामुळे नर मादी वेगवेगळे झाले अर्थात पिल्लाला मादीने बरोबर घेतले होते. पण ते थोडेसेच दूर जाउन जमिनीत अगदी दबून बसले. आता ते एतक्या जवळ होते की माझ्या लांब पल्ल्याच्या लेन्सच्या “minimum focusing distance” च्या आत होते, त्यामुळे मी गाडी हळूहळू मागे नेली आणि मगच मला त्यांची छायाचित्रे घेता आली.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

Saturday, April 10, 2010

पाण्यातले चमचे.
आज जगभरात या पक्ष्यांच्या सहा उपजाती आढळतात. मोठ्या आकाराचे हे पक्षी पाणथळ जागी दिसतात. मोठे तलाव, नद्या, खाड्या ही यांची आवडीची ठिकाणे. साधारणत: यांच्या सर्व जाती ह्या प्रामुख्याने पांढऱ्या रंगाच्या असतात, फक्त यातील एकच जात ही आपल्या गुलाबी फ्लेमींगोसारखी गुलाबी असते. मात्र भारतात ही जात काही सापडत नाही. भारतातील जात पांढऱ्या रंगाचीच असून प्रौढ पक्ष्यांच्या चोचीचे टोक पिवळे असते. विणीच्या हंगामात त्यांच्या डोक्यावर डौलदार तुरा फुलतो आणि छातीवर पिवळा पट्टा दिसतो. यांच्या पिल्लांची चोच मात्र गुलाबी असते. यांचे शरीर जरी पांढरेशुभ्र असले तरी उडताना मात्र पंखांच्या टोकाला काळा रंग प्रामुख्याने नजरेत भरतो. या सर्वच पक्ष्यांची चोच खास आकाराची असते. अगदी आपल्या चमच्यासारखी ती दिसते आणि तसेच कामसुद्धा करते म्हणूनच यांचे नाव "चमच्या" किंवा इंग्रजीमध्ये स्पूनबील असे सार्थ आहे. हे पक्षी उथळ पाण्यात उभे रहातात आणि आपली लांब चमच्यासारखी चोच पाण्यात आडवी फिरवत रहातात. चोचीला काही मासे, बेडूक किंवा तत्सम खाद्यपदार्थ लागले तर ती चोच पटकन बंद करून ते तो प्राणी गिळून टाकतात. विणीच्या हंगामात नर मादी मोठ्या झुडपांवर काटक्यांचा ढिग जमवून त्याचे घरटे करतात. सहसा हे पक्षी बगळ्यांसारखे एकत्र घरटी करून रहातात. मादी घरट्यात ३ ते ५ अंडी घालते. अंड्यांचे आणि पिल्लांचे पालन पोषण नर मादी जोडीने करतात.
या पक्ष्याला मी सर्वप्रथम बघितले ते म्हैसुर जवळच्या श्रीरंगपट्ट्नम येथील रंगनथिट्टू या पक्षी अभयारण्यात. सकाळच्या वेळी बोटीतून फेरी मारताना अनेक नविन पक्षी दिसत होते. मधेच एखादी मगर वरून पडलेले बगळ्याचे पिल्लू गट्टम करत होती. तिथेच एका मोठ्या खडकाजवळ यांची ३/४ लहान पिल्ले पाण्यात खेळत होती आणि मध्येच पाण्यात आपल्या चमच्या चोचीने मासे पकडून खात होती. त्या अवखळ पिल्लांचे पाण्यात खेळणे आणि त्यांच्या गुलाबी चोची उन्हात चमकताना बघणे हे दृष्य कायम लक्षात रहाण्यासारखे होते. त्यावेळी फिल्म कॅमेरे असल्यामुळे आणि लांब पल्ल्याची झूम लेन्स नसल्यामुळे मला काही त्यांची छान छायाचित्रे काढता आली नाहीत पण ते दृष्य अजुनही मी कधीच विसरू शकत नाही. यानंतर उरण येते स्थलांतरीत पक्षी बघण्यासाठी नियमीत जाताना लहान मोठ्या बगळ्यांच्या गर्दित हे पक्षी मला परत दिसले. बगळ्यांसारखेच पांढरे पण काहीचे मोठे आणि त्यांची चोच जर बारकाईने बघितली तर त्यांचे वेगळेपण सहज लक्षात यायचे. उडताना हे पाय ताणून आणि चोच सरळ पुढे ठेवून उडतात. त्यामुळे उडतानासुद्धा त्यांच्या चोचीचे वेगळेपण सहज ओळखता येते. त्यातून सहसा हे एकदम उडले की मोठ्या थव्याने उडतात त्यामुळे आकाशात त्यांचे उडणे हे पटकन वेगळे जाणवते. नांदूर माधमेश्वर, भिगवण, भरतपूर अश्या ठिकाणी हे आपल्याला हमखास बघायला मिळणार.
गेल्या वर्षी वेलावदार ला काळवीटे बघायला जाताना मधे लोथलच्या जवळ एका पाणवठ्यावर मोठ्या प्रमाणावर आम्हाला पेलीकन आणि हे चमचे दिसले. अर्थातच पेलीकन आमच्याकरता नविन असल्यामुळे आम्ही त्यांच्या छायाचित्रणाच्या मागे लागलो. पण सतत पेलीकनच्या आसपास या चमच्यांची लुडबुड जाणवत होती. त्या तीथून पुढे वेलावदारला पोहोचल्यावर तिथल्या तळ्यात सुद्धा आम्हाला पेलीकन आणि हे चमचे दिसले. पेलीकनच्या तावडीतून सुटलेल्या माश्यांवर बहुतेक हे चमचे ताव मारत असावेत, कारण पेलीकनच्या आसपासच हे आपली लांब चोच पाण्यात घालून मान सतत डावीकडे, उजवीकडे हलवत आत पाण्यात मासे पकडायचे. मासा मिळाला की तो ते पटकन गिळायचे आणि परत चोच पाण्यात बुडवून मासे शोधायचे. कधी कधी एकाच माश्याच्या मागे लागल्यामुळे त्यांची धावपळ आणि मारामारीसुद्धा व्हायची. स्थीर कॅमेरात हे सर्व काही टिपणे शक्य नसले तरी ही दृष्ये कायम लक्षात राहाण्यासारखी आहेत.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
पाण्यातले "कुदळे".
पाणथळीच्या जागा ह्या नेहेमीच वैविध्यपुर्ण जैवविविधता असणारे अधिवास असतात. यात पाण्याबरोबरच त्याच्या अनुषंगाने रहाणाऱ्या अबेक प्राणी, पक्षी, मासे, किटक यांच्या जाती तिथे मुबलक प्रमाणात बघायला मिळतात. ही पाणथळीची जागा जेवढी जुनी आणि मोठी तेवढीच तीकडची जैवविविधता जास्त असते. या पाणथळीच्या जागांमधे नद्या, मोठे तलाव, खाड्या, धरणांचे पाणी साठवण्याचे जलाशय असे वेगवेगळे प्रकार येतात. भारतात सापडणाऱ्या १२३० पक्ष्यांच्या जातींपैकी २३% जाती ह्या पुर्णपणे या पाणथळी प्रदेशांवर अवलंबून असतात. या पाणपक्ष्यांमधे अनेक प्रकारची बदके, हंस, पाणकावळे, पाणकोंबड्या, बगळे, करकोचे, चमचे, कुदळे असे अनेक पक्षी येतात. पुर्वी पक्षी अभ्यासकांनी बगळे, करकोचे, चमचे आणि कुदळे यांची एकत्र वर्गवारी केली होती. सध्या मात्र अगदी नविन वर्गिकरणांच्या नियमांमुळे चमचे आणि कुदळे हे वेगळ्या वर्गात समजले जातात. आकाराने मोठे असणारे हे पक्षी उडण्यात पण तरबेज असतात. आपल्या लांबलचक पंखांनी ते पाण्याच्या जलशयावर हवेत संथपणे तरळताना हमखास दिसतात. ह्या दोन्ही जातींच्या पक्ष्यांच्या चोची खास आकाराच्या असतात. चमच्यांच्या चोची लांब आणि चमच्यासारख्या असतात तर कुदळ्यांच्या चोची लांब, खाली वाकलेल्या आणि एखाद्या कुदळीच्या पात्यासारख्या असतात. ह्या लांब आणि वक्राकार चोचीमुळे त्यांना चिखलाच्या आत दडलेले प्राणी, खेकडे, मासे पकडणे सोपे जाते.
आपल्याकडे आढळणारा काळा कुदळ्या हा आकाराने मोठा असतो. त्याचा रंग जरी काळा असला तरी त्याच्या पंखांवर झळाळणाऱ्या रंगाची झाक असते. याच्या खांद्यावर पांढऱ्या रंगाची पिसे असतात तर डोक्यावर गडद लाल धब्बा असतो. नर, मादी हे दोघेही दिसायला सारखेच असतात. हा जरी पाणपक्षी असला तरी तो रात्री रहायला उंच झाडांवर जातो. ह्याच्या इतर भाउबंदांसारखा मात्र तो कायम पाण्या जवळ आढळत नाही तर कधी कधी दाट जंगलांमधेसुद्धा दिसून येतो. ह्याच्या सारखाच दुसरा कुदळ्या म्हणजे चमकदार कुदळ्या. ही जात भारतात जास्त सहज आणि सर्वत्र आढळते. आकाराने हे इतर कुदळ्यांपेक्षा लहान असतात. दुरून जरी हे काळेच भासत असले तरी त्यांचा रंग अगदी झळाळणाऱ्या निळ्या, जांभळ्या, हिरव्या रंगाचा असतो. याचमुळे त्यांचे इंग्रजी नाव "ग्लॉसी ईबीस" असे आहे. विणीच्या हंगामात यांचे रंग अजुन जास्त झळाळणारे होतात. उडताना बगळ्यांप्रमाणे मान आखडून न घेता, ती लांबलचक ठेवून ते उडतात. काळा कुदळ्या हा सहसा एकेकटा किंवा जोडीने रहातो. तर हे चमकदार कुदळे मात्र नेहेमीच मोठ्या संख्येच्या थव्याने रहातात. पाणथळी जागेत एकत्र ह्या १०/१५ पक्ष्यांना मासे मारताना बघणे म्हणजे खरोखरच मनोहारी दृष्य असते.
हे स्थलांतरीत पक्षी असल्यामुळे अर्थातच यांना बघण्याचा योग्य हंगाम म्हणजे थंडीचा असतो. साधरणत: ऑक्टोबरपासुन पुढे ते आपल्याकडे दिसायला लागतात. चमकदार कुदळ्यांना बघायला अगदी खास कुठल्या मोठ्या भरतपूर सारख्या पक्षी अभयारण्यात जायची गरज नाही. कुठल्याही गावाच्या, शहराच्या बाहेरा तलाव, पाणथळीची जागा असेल तर तिथे हे हमखास आढळाणार. आकाराने जरी हे मोठे असले तरी ते सहसा आपल्याला फारसे जवळ येउ देत नाहीत. त्यामुळे यांच्या छायाचित्रणाकरता जर लांन पल्ल्याची लेन्स असेल तर आपल्याला यांची उत्तम छायाचित्रे काढता येतात. डिसेंबर महिन्यात मी बांधवगडच्या जंगालात गेलो असताना, जंगलात जायचे परमीट काढायला आमची जीप रांगेत उभी होती. तीथे बाजूच्या झाडावर हा काळा कुदळ्या भर उन्हात चमकत होता. दुपारच्या उन्हात त्याचे काळे, निळे चमकणारे पंख आणि पिवळा धम्मक डोळा अगदी उठून दिसत होता. तो सुद्धा बहुतेक खाउन पिउन निवांत होता त्यामुळे त्याचे आम्हाला मुबलक छायाचित्रण करता आले. आता खास विणीच्या हंगामात जाउन त्यांच्या एकत्रीत घरट्यांचे छायाचित्रण करायचा मानस आहे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
www.yuwarajgurjar.com

Friday, April 9, 2010

थापट्या...
आपल्याकडे आढळणाऱ्या बदकांपैकी हे एक आकर्षक, बहुरंगी बदक. याला मराठीत "थापट्या" किंवा इंग्रजीमध्ये "शॉव्हलर" म्हणतात. यांची चोच जरा जास्तच लांब आणि पुढे अगदी चपट फावड्यासारखी असते म्हणूनच यांची ही नावे आहेत. ही लांब आणि चपट चोच अगदी अडीच इंच लांब असते आणि त्यावर जवळजवळ ११० अतिबारीक छिद्रे असतात ज्यातून त्यांचे अन्न पाण्यातून गाळले जाते. या थपट्यांच्या नराचे डोके चमकदार, झळाळणारे, हिरवे असते. छाती पांढरीशुभ्र असते तर पोट आणि पंख चमकदार पिवळे, तपकीरी असतात. पंखावर खांद्याच्या इथे चमकदार राखाडी, निळसर धब्बा असतो. पंख उघडले तर त्यावर चमकणारा, झळाळणारा हिरव्या रंगाचा पट्टा असतो. यांची चोच काळी असते तर पाय उठावदार भगव्या रंगाचे असतात जे पाण्यात पोहतानासुद्धा सहज दिसून येतात. थापट्यांची मादी मात्र अगदीच साध्या रंगाची असते. तीचा पिवळसर रंग तपकीरी ठिपक्या ठिपक्यांचा असतो. उडताना तीच्या पिसांची टोके राखाडी निळसर दिसतात तर त्याच्या खालची पिसे ही गडद हिरव्या रंगाची असतात. हीचा एकंदर अविर्भाव हा मॅलार्ड आणि गढवाल या बदकांच्या माद्यांसारखाच असतो.
या बदकांची जोडी कायम असते आणि ते त्यांचे जोडीदार दर हंगामात बदलत नाहीत. नर मादीला आकर्षित करायला अनेक क्लुप्त्या वापरतो. मिलनानंतर यांची घरटी उथळ पाण्याजवळच्या गवताळ प्रदेशात किंवा खुरट्या झुडपांमधे असतात. यांना गोड्य अथवा खाऱ्या पाण्याच्या जवळच्या जागासुद्धा चालतात. पाण्याजवळच काड्यांच्या आधाराने त्यांचे घरटे बांधलेले असते. यात मादी अंदाजे ९ अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेली त्यांची पिल्लावळ ही पुढे कित्येक दिवस पाण्याजवळच्या दाट झाडीत लपवली आणि वाढवली जाते. नंतर मात्र ती त्यांच्या पालकांबरोबर उघड्यावर, पाण्यात त्यांच्या पाठोपाठ पोहताना दिसतात. ही बदकाची जात स्थलांतरीत आहे आणि आपल्याकडे थंडीच्या मोसमात उत्तरेकडून येतात. इतर सर्व बदकांप्रमाणेच ही जलद आणि लांब उड्डाणाकरता प्रसिद्ध आहेत. पाण्यामधे आपली फताडी चोच इथून, तिथून फिरवून हे त्यांचे खाद्य मिळवतात. पाण्यातले मासे, किटक, शंख याच बरोबर पाण वनस्पतींच्या बिया, त्यांची मुळे, कंद, शेवाळ हे त्यांचे मुख्य अन्न असते. आज जगभरात यांची संख्या कमी नसली तरी शिकारीमुळे आणि त्यांच्या अधिवासाच्या नाशामुळे त्यांची संख्या रोडावत आहे.
साधारणत: १० वर्षांपुर्वी श्रिहरीकोटा इथल्या पुलिकतच्या तळ्यांमधे या बदकांना मी सर्वप्रथम बघितले. बीएनएचएस संस्थेतर्फे पक्षी स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी आम्ही "बर्ड रिंगींग" करत होतो. दिवसभर जाळ्यांमधे अनेक विविध जातींचे पक्षी पकडून त्यांची मोजमापे, वजन घेऊन, त्यांची नोंद ठेवून मग त्यांच्या पायात विशीष्ट्य अनुक्रमांक असलेली कडी घालून मग आम्ही त्यांना मोकळे सोडून द्यायचो. प्लोव्हर, सॅंडपायपर, स्टिंट, टर्न याच बरोबर हे थापट्या बदकसुद्धा आम्हला एकदा सापडले. आपला विश्वास बसणार नाही एवढे त्यांचे पंख मऊ असतात आणि तेवढेच त्यांच्यावर अप्रतिम रंग असतात. त्याला अगदी जवळून बघितल्यावर, कडी घालून त्याला मोकळे सोडले आणि ते लगेच भन्नाट वेगाने उडून गेले. त्यानंतर या आणि इतरही बदकांना मी भरतपूर, नांदूर मधमेश्वर, जायकवाडी अश्या अनेक ठिकाणी बघितले. जलाशयांची मोठी व्याप्ती आणि या पाणपक्ष्यांचे उघड्यावर असणारे वास्तव्य यामुळे ते नेहेमीच आपल्यापासून त्यांच्यात दूर अंतर ठेवतात. अर्थातच यामुळे त्यांच्या छायाचित्रणासाठी मोठी, लांब पल्ल्याची लेन्स जरूरी ठरते. या बदकांना आपली जर जरी चाहूल लागली तर ते पाण्यात आपले वल्ह्यासारखे पाय मारत दूर निघून जातात. त्यांच्यात आणि आपल्यात जर का अगदीच कमी अंतर उरले तर मात्र ते लांब उडून सुद्धा जातात. आता नुकताचे मी बारामती जवळच्या भिगवणला जाउन आलो तेंव्हा तिकडच्या डिकसळ, कुंभारगाव या भागात मात्र मला ही बदके अगदी जवळून बघता आली. तिकडच्या नितळ पाण्यात या बदकांचे अनेक खेळ सुरू होते. खाण्याकरता होणारी त्यांची धावपळ, दोन नरांची आपापसात चढाओढ, तर पंख झटकण्याकरता केलेली पंखाची फडफड हे बघणे आणि कॅमेरात टिपणे म्हणजे एक वेगळाच आनंददायी अनुभव होता.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

कूटची धावपळ.

कूट हा खरा तर बदकासारखा दिसत असला तरी पण तो “रेल” आणि “क्रेक” यांच्या कुळातला आहे. हे रेल आणि क्रेक अतिशय लाजाळू, हसा उघड्यावर न दिसणारे असतात. ते वावरतानासुद्धा एकेकटे किंवा जोडीने वावरतात. मात्र याच्या अगदी उलट हे कूट आहेत. हे विणीच्या हंगामाव्य्ततिरीक्त कायम मोठया संख्येने एकत्र असतात. त्यांचा वावरसुद्दा अगदी उघड्यावर कायम असतो. जगात हे कूट युरोप, आशिया, आस्ट्रेलिया आणि सध्या न्युझीलंडमधे आढळतात. साधारणत: हे आपल्याला गोड्या पाण्याच्या तळ्यांमधे, पाणथळ जागी दिसतात. हे कूट ३६ ते ४२ सें.मी. आकाराचे असते. त्याचा रंग गडद काळा असून तो चमकदार असतो. त्यांची चोच आणि त्यामागे कपाळापर्यंत एक ढालीसारखा भाग मात्र पांढराशुभ्र असतो. हा काहीसा टीळा लावल्यासारखा दिसतो म्हणूनच यांना मराठीमध्ये “वारकरी” असे म्हणतात. यांचे डोळे गडद लाल असतात आणि इतर पाणपक्ष्यांसारखेच यांच्या पण लांब पायांना वल्हवता येण्यासारखे पडदे असतात. यांच्या लहान पिल्लांच्या पोटावर पांढरा, राखी रंग असतो आणि त्यांना तो पांढरा टीळा नसतो. घरट्यातील नवजात पिल्लेपण काळ्या रंगाची असतात पण त्या काळ्या रंगाच्या पिसांच्या टोकाला पिवळा रंग असतो. त्यांचे डोके भगवे लाल असते तर चोच पण लाल असून तीचे टोक पिवळत असते.

ही कूट सहसा उडायला नाखुश असतात. अगदीचे धोका जवळ आला आहे असे जाणवले तर पाण्याच्या पृष्ठभागावर फताक फताक पाय मारत, पाणी उडवत जवळच जाउन बसतात. असे मात्र असले तरी स्थलांतराच्या वेळी मात्र ते प्रचंड अंतर अगदी लिलया पार करतात. यांचा आहार मिश्राहारी असतो. पाण्यातले जीवजंतू, इतर पक्ष्यांची अंडी, शेवाळे, पाणवनस्पतींची फळे, बिया त्यांना आवडतात. नुकताच आम्ही भिगवाणला गेलो असताना पाण्यात बुड्या मारून त्यांना मोठ्या गोगलगायी खाताना बघितले. हे खाणे मिळवण्यासाठी ते पाण्यात खोल बुड्या मारताता आणि खाली कित्येक सेकंद राहून तिथे आपले खाणे मिळवतात. या अश्या पाण्याखाली बुडया मारण्यासाठी आपल्या सगळ्या पिसातून हवा काढून टाकण्याची कला त्यांना अवगत असते त्यामुळे ते अधिक सहजपणे पाण्याखाली जाउ शकतात. पाण्यावरच्या वनस्पतींची फळे, बिया मिळवणे किंवा अगदी किनाऱ्यावर जाउन जमिनीवर सुद्धा त्यांचे खाणे मिळवतात. विणीच्या काळात ही जात आक्रमक असते आणि इतर पक्ष्यांना दूर पळवून लावते. या काळात त्यांची हद्द ठरलेली असते आणि क्वचित ते इतर बदकाच्या घरट्यांना त्यातली अंडी उलथवून बळकावतात. यांचे घरटे पाणगवताच्या सुक्या काड्यांनी, इतर काटक्यांनी बनलेले असते. या घरट्यात मादी अंदाजे १० अंडी घालते आणि एका मोसमात जर त्या भागात भरपूर खाणे उपलब्ध असेल तर २/३ वेळासुद्धा अंडी घालते. अंड्यांची संख्या जरी जास्त असली तरी त्यातली २/४ पिल्लेच पुढे वाढतात. इतर पिल्ले ही मार्श हॅरीयर, सी गल्स अश्या पक्ष्यांना बळी पडतात. एवढेच नव्हे तर जर का त्या ठिकाणी खाण्याचे जर दुर्भिक्ष असेल तर त्यांचे पालकच त्यांना मारून खातात. इतर वेळी मात्र अंडी उबवण्याचे आणि पिल्लांना वाढवण्याचे काम नर व मादी दोघेही करतात. या पिल्लांना थोडी मोठी होईपर्यंत कायम त्यांच्या जवळ ठेवले जाते.

या कूटचे छायाचित्रण तसे सोपे असते. एकतर ही सहज सर्वत्र भारतभर दिसत असल्यामुळे त्यांच्या साठी खास कुठे असे जावे लागत नाही. त्यातून ही धीट असल्यामुळे पटकन उडत नाहित त्यामुळेही त्यांचे छायाचित्रण सहज शक्य होते. जर का आपल्याकडे लांब पल्ल्याची झूम लेन्स असेल तर हे काम अधिक सोपे होते. मात्र यात अडचण अशी असते की हे कूट कायम मोठ्या संख्येने एकत्र असतात त्यामुळे त्यातला एक पक्षी बेगळा छायाचित्रणासाठी काढणे हे थोडे कठिण असते. या कूटना मी आजपर्य़ंत उरण, नांदूर मधमेश्वर, भरतपूर, थोल, नल सरोबर अश्या अनेक ठिकाणी बघितले, छायाचित्रण केले. पण नुकताच भिगवणला गेलो असताना मला त्यांच्या विणीच्य हंगामात त्यांच्या पुर्ण “फॅमीलीचे” छायाचित्रण करता आले. जानेवारीच्या माझ्या भिगवणच्या भेटीत मला त्यांची थोडी मोठी झालेली पिल्ले आणि त्यांचे पालक दिसले. काही ठिकाणी हे पालक त्यांना बुड्या मारून मारून गोगलगायी भरवत होते. काही ठिकाणी ते पालक त्यांना पाणगवताच्या बिया काढून काढून भरबत होते. काही ठिकाणी तर थोडी मोठी झालेली पिल्लेच एकत्र पाण्यातील शेवाळे खाताना आढळली. फेब्रुवारीच्या माझ्या भिगवणच्या भेटीत तर मला काही काही जोड्यांना दुसऱ्यांदा पिल्ले झालेली आढळली. ही पिल्ले एकदम नविन आणि लहान होती. त्यांचे पालक त्यांना अजिबात एकटे सोडत नव्हते. ती पिल्ले पण आई बाबांच्या मागे मागे पोहत असायची, जरा आई बाबा खाणे मिळवण्यासाठी उघड्यावर आले तर ती मागेच झाडात लपून रहायची. त्यांचे छायाचित्रण मात्र दूरूनच करावे लागत होते पण एकदा आम्ही आमची गाडीत बसलो असताना, आम्ही आत असल्यामुळे त्यांना आमची काहीच हालचाल जाणवली नाही आणि त्यामुळे त्यांनी त्या पिल्लांना अगदी काठाच्या जवळच्या भागात आणले. आम्ही पण अतिशय कमी हालचाली करत फक्त गाडीच्या खिडकीतून लेन्स बाहेर काढून त्यांचे मनसोक्त छायाचित्रण केले.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

दिमाखदार जांभळी पाणकोंबडी.
साधारणत: पाणपक्षी हे जंगलातल्या पक्ष्यांसारखे रंगीबेरंगी नसतात. त्यांचे रंग मातकट, मळखाउ, काळसर असतात. अर्थातच याला ही जांभळी पाणकोंबडी अपवाद आहे. अतिशय गडद निळा, हिरवट, जांभळा रंग या पाणकोंबडीचा असतो. हीची शेपुट आखुड असते आणि चालताना ही शेपुट वर खाली हलवायची तीची सवय असते. यामुळे जेंव्हा जेंव्हा ही शेपुट वर होते तेंव्हा तेंव्हा त्या शेपटीखालचा पांढराशुभ्र कापसासारखा पिसांचा पुंजका नेहेमी नजरेत भरतो. हीची चोच जाड आणि लालभडक असते. चोचीपासून वर कपळापर्यंत एक ढालीसारखा भाग असतो. हा भागसुद्धा लालभडक आणि चकचकीत असतो. हीचे पाय मजबूत लाल, भगवे असतात. पाणपक्षी असल्यामुळे अर्थातच या पाण्यात लिलया पोहू शकतात पण पाण्यात पोहोण्यापेक्षा त्या आजुबाजुला, काठावर दुडकत दुडकत चालणेच जास्त पसंत करतात. मात्र त्यांना जर का अश्या वेळी काही धोका जाणवला तर त्या तिथून उडून दूर जाऊन बसतात. या जांभळ्या पाणकोंबड्या तश्या भारतात सर्वत्र सापडतात. मोठी तळी, धरणांची जलाशये, नद्या या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. आज जगभरात यांच्या १३ उपजाती आढळतात आणि त्या प्रत्येक उपजातीत दिसण्यात, रंगात, आकारात थोडाफार फरक आढळतो.

पाणवनस्पतींचे कोंब, पाणगवताची कोवळी पाने हे या जांभळ्या पाणकोंबडीचे खाणे आहे. पण याचबरोबर ती मासे, बेडूक, गोगलगायी असे छोटे प्राणीही खाते. आजुबाजुला असणाऱ्या दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यामधली अंडी चोरणे, त्यांची पिल्ले पळवणे असे सुद्धा ती प्रसंगी करते. खाताना चोचीने क्ष्य थेट खाण्यापेक्ष्या, तीचे भक्ष्य ती तीच्या लांबलचक पायाच्या पंज्यात पकडून अगदी तो पंजा तोंडापर्य़ंत नेउन मग ते भक्ष्य खाते. यांचा विणीचा हंगाम निश्चीत असला तरी वेगवेगळ्या जागांप्रमाणे आणि पावसाच्या काळाप्रमाणे बदलता असतो. पाणवनस्पतींच्या जंजाळात या जांभळ्या पाणकोंबड्या आपली घरटी करतात. हे घरटे मोठे असते आणि ते या पाणवनस्पतीच्या फांद्यांपासून आणि तिथेच पाण्यात उपलब्ध असणाऱ्या सामानापासून बनवले जाते. पाण्यात तरंगणारे हे घरटे पाण्याच्या पातळीपासून थोडे उंचावरच असते. जांभळ्या पाणकोंबडीचा नर मादीला आकर्षित करण्यासाठी पाणगवताची काडी चोचीत आडवी धरून, मान वर खाली करून तीला साद घालतो. मजेची गोष्ट अशी की जोडी जमली तरी एका मादीशी अनेक नर मिलन करतात. याचमुळे अंडी उबवण्याचे काम अनेक माद्या आणि अनेक वेगवेगळे नर करतात. एवढेच नव्हे तर आधीच्या वर्षी आलेली तरूण पिल्ले सुद्धा या अंड्यांना उबवण्याचे काम अगदी इमानेइतबारे करतात. त्या एकाच घरट्यात अगदी २/३ वेगवेगळ्या माद्यांचीही अंडी असू शकतात. एका विणीची हंगामात मादी दोन वेळासुद्धा अंडी देउन त्यांना वाढवू शकते. या अंड्याचा रंग लालसर, पिवळट असतो आणि त्यावर त्याच गडद रंगाचे ठिपके असतात. एका घरट्यात अंदाजे ३ ते ६ अंडी असतात. अंदाजे २० ते २५ दिवसानंतर अंड्यातून पिल्ल्लू बाहेर येते आणि लगेचच घरट्याच्या बाहेर पडते पण पुढचे २/४ दिवस ते घरट्यात परत येत रहाते. त्याचे रक्षण आणि त्याला अन्न पुरवण्याचे काम पुढचे १०/१२ दिवस त्याचे पालक आणि त्यांचे इतर सहकारी करतात. त्यानंतर मात्र ते पिल्लू स्वत:चे अन्न स्वत:च मिळवते.

या जांभळ्या पाणकोंबड्यांना २२/२३ वर्षांपुर्वी मी प्रथम पाहिले. मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल शहराच्या बाहेरच असलेल्या बल्लाळेश्वराच्या तळ्यात या जांभळया पाणकोंबड्या शेकडोंनी होत्या. आम्ही अगदी पहाटे पहाटे एस.टी. बस पकडून पनवेल ला गेलो आणि महामार्गावरच उतरून दुर्बिणीतून त्या जांभळ्या पाणकोंबडयांना बघितले. भर शहरात, अगदी कायम गजबजलेल्या वाहतूकीच्या मरस्त्याच्या बाजूलाच त्यांचे बागडने अगदी सुखात सुरू होते. इतक्या जवळ आणि तेसुद्धा इतक्या मोठ्या संख्येने ते रंगीबेरंगी पक्षी बघून मन अगदी थक्क झाले. कमळाच्या मोठ्या मोठ्या गोल पानांवर त्याचे खाणे पकडण्यासाठी पळत जाणे, एकमेकांच्या मागे धावपळ करणे, थोडा धोका जाणवला तर पटकन उडून दुसऱ्या भागात उडणे हे खरोखरच मजेशीर होते. त्यानंतर नेहेमी अगदी बसमधून जातानासुद्धा उजव्या खिडकीत बसून त्यांना कायम न्याहाळत राहिलो. आज मात्र बल्लाळेश्वराचा तलाव नावाला उरला आहे, आजुबाजुला उंच, उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. जे आधी शेकडोंनी वेगवेगळे पक्षी दिसायचे ते मुष्कीलीने एखाद दुसरे प्रयासाने शोधायला लागतात. मात्र या जांभळ्या पाणकोंबड्या भरतपूर, नलसरोवर, उरण या ठिकाणी नेहेमी मोठ्या संख्येने दिसतात. भरतपूरला तर काही काही भागात तिथला हिरव्या गवतात यांचे जांभळे रंग आणि कूट्चे काळे रंगच फक्त दिसतात. या वर्षी भिगवणला आम्हाला या जांभळ्या पाणकोंबड्या आणि त्यांची पिल्ले सुद्धा दिसली. प्रौढ जांभळी पाणकोंबडी जेवढी रंगीबेरंगी आई उठावदार तेवढेच ते पिल्लू काळसर आणि राखी रंगाचे असते. अर्थात त्याला तिथल्या गवतात छपण्यासाठी तोच रंग उपयुक्त ठरतो. त्यामुळे याही वेळेला त्या प्रौढ आणि पिल्लांचेही छायाचित्रण करता आले, पण तरीसुद्धा मनामधे तीच पनवलेच्या तळ्यात ठुमकत चालणारी, चालताना आपली आखुड शेपुट वर करून खालचा पांढरा गोंडा दाखवणारी, लाल टिळावाली जांभळी पाणकोंबडी कोरलेली आहे.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

Wednesday, January 13, 2010

सुताराची ठकठक.
जंगलातून फेरफटका मारताना अचानक एखादा सोन्याचा तुकडाच हवेत तरळावा तसा हा सुतार पक्षी सुसाट उडत झाडीत गडप होऊन जातो. जत नीट निरिक्षण केले आणि दुर्बिणीतून रोखून बघितले तर जवळच्याच एखा झाडाच्या खोडामागे हा लपून फक्त डोके बाहेर काढून तुम्हालाच बघत असतो. त्याची धारदार, लांबलचक चोच आणि डोक्यावरचा लालभडक तुरा तो तिथेच आहे याची खात्री पटवून देतो. आज जगभरात यांच्या २००हून अधिक उपजाती आढळतात आणि त्यातल्या अनेक विविध रंगी सुतारांच्या जाती आपल्याला भारतातील जवळपास सर्व जंगलात बघायला मिळतात. यांच्यातील चिमणा अथवा "पिग्मी" सुतार हा तर जेमतेम चिमणीएवढा लहान असतो तर सर्वात मोठा "स्लेटी" सुतार हा डोमकावळ्याएवढा मोठा असतो. सर्वसाधारणपणे ह्या सुतारांना आकर्षक रंगसंगती बहाल केलेली असते. यात अगदी सोनेरी पिवळा, लाल, काळा, हिरवा असे रंग तर आढळतातच पण त्यावर ठिपक्यांची, पट्ट्यांची नक्षीसुद्धा असते.
या सुतार पक्ष्यांची खासियत म्हणजे त्यांची लांबलचक, धारदार आणि अणुकुचीदार चोच. एखाद्या ओल्या अथवा सुक्या झाडाच्या खोडावर अतिशय वेगाने आघात करत, त्याला छिन्नीने कोरावे तसे कोरून आतली अळी किंवा किटक लिलया टिपून, ओढून बाहेर काढतात. हे करताना त्यांची विशीष्ट जीभसुद्धा त्यांना फार उपयोगाची ठरते. ही लांब, चिकट जीभ अगदी खोडाच्या आत लपलेला जीव सुद्धा बाहेर खेचून आणते. बाहेर आल्यावर पण तो जीव पडू नये म्हणून त्यांना त्या जिभेला विळखा घातला जातो. सहसा सुतार पक्ष्यांच्या जाती ह्या झाडावरच रहाताना आढळतात. अगदी सरळसोट उभ्या खोडावर हा सुतार पक्षी झरझर एखाद्या शिडीवर चढल्यासारखा चढतो. यासाठी त्याला टोकदार नख्या असलेले पाय आणि मजबूत शेपटीचा उपयोग होतो. यांच्या शेपटीची पिसे ताठर असतात आणि त्यामुळे ती खोडावर दाबून तीचा घट्ट आधार घेता येतो. खोडातले किटक जसे हे खाण्यासाठी ओढून काढतात तसेच त्या कठीण खोडावर सतत घाव घालून अगदी गोलाकार २/३ इंची व्यासाचे बीळ आत तयार करून त्यात ते आपले घरटे बनवतात. दोघेही नरमादी जोडीने हे घरटे बनवतात. मादीने आत अंडी घातल्यावर, पुढे सुद्धा पिल्लांची काळजी ते नर मादी दोघेही घेतात. घरट्याच्या आत अगदी सुरक्षित असलेल्या या अंड्यांचा रंग पांढरा असतो. ही अंडी उघड्यावर नसल्यामुळे त्यांच्यावर मिळूनमिसळून जाणारे रंग, धब्बे अथवा नक्षी नसते. मादी अंदाजे २/५ अंडी घालते. ही अंडी साधारणत: दोन आठवडे उबवली जातात आणि त्यानंतर १८/३० ती आत घरट्यात असतात त्यानंतर ती घरट्यातून बाहेर पडून स्वतंत्र रहातात.
आपल्या जंगलात या सुतारांच्या अनेक जाती आढळतात. त्यातला सोनपाठी सुतार अगदी शज दिसत असला तरी इतर जाती सापडायला कठीण असतात. हे पक्षी अगदी लाजरेबुजरे असल्यामुळे त्यांचे छायाचित्रण अगदी काळजीपुर्वक करावे लागते. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात, भरतपूरच्या जंगालात थंडीचा कडाका जोरात होता. त्यात भर म्हणून प्रचंड धूके पडले होते, अगदी सकाळी साडेआठ पर्यंत काही दिसत नव्हते. अचानक एकदम धूके विरले आणो सुर्यप्रकाश चमकू लागला आणि पक्ष्यांची खाण्यासाठी एकच दंगल उडाली. त्याचवेळी मला ही सुतार पक्ष्यांची जोडी टिपता आली. खरेतर त्या झाडावर सहा सोनपाठी सुतार बागडत होते. पण त्यांची खाण्यासाठी धावपळ चालली होती आणि ते वेगवेगळ्या फांद्यांवर असल्यामुळे मला काही ते एका "फ्रेम"मधे घेता आले नाहित. उन्हाळ्यात सासन गीरच्या जंगलात हा चिमणा सुतार आमच्या जीपच्या इतका जवळ आला की शेवटी आमच्या लेन्सच्या "मिनीमम फोकसिंग डिस्टंस" च्य आत असल्यामुळे चक्क आम्हाला जीप मागे नेऊन त्याच्यामधले आणि आमच्या मधले अंतर वाढवायला लागले. अगदी १५ मिनिटे त्याने आमच्या समोर कोरून कोरून अनेक किडे मटकावले आणि आम्हाला त्याचे छान छायाचित्रण करता आले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
ठिपकेवाला कवडा.
आपल्या शहरात, गावात दिसणारी राखाडी रंगाची कबुतराची जात असते तीचेच हे जंगलातील भाऊबंद. हे जरी जंगलात दिसत असले तरी सर्वसाधारणपणे गावात, थोडे शहराबाहेर अगदी सहज दिसतात. गावाच्या आजुबाजुच्या शेतातील, हमरस्त्याच्या बाजुला असणाऱ्या वीजेच्या अथवा टेलीफोनच्या तारांवर हे पक्षी हमखास बसलेले आढळतात. यांचा आकार अंदाजे कबुतराएवढाच असतो. रंग मात्र आकर्षक गुलबट तपकीरी असुन मानेवर काळ्या रंगाचा मोठा धब्बा असतो आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. यांच्या पंखांवर पण ठिपक्यांची छान नक्षी असते. यांचे पाय कबुतरांसारखेच लालभडक असतात. उडताना यांचे शरीर जास्त फिकट दिसते पण काळसर शेपटीवर पांढऱ्या ठिपक्यांची नक्षी उठून दिसते.
हे पक्षी आपल्याला सर्वत्र आणि सहज दिसतात आणि सहसा रस्त्यावरच दाणे टिपताना आढळतात. गाडी अथवा आपण अगदी जवळ जाईपर्यंत ते बिलकूल उडत नाहित मात्र अगदी शेवटच्या क्षणी भुरकन उडत जाउन परत पुढे थोड्याच अंतरावर जाउन बसतात. यांचे मुख्य अन्न हे गवताच्या बिया, इतर दाणे हे असते त्यामुळे हे आपल्याला रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवतात, शेतांमधे, कुरणांमधे जास्त आढळतात. इतर कबुतरे जशी मोठ्या थव्याने एकत्र असतात तसे हे कवडे मात्र एकेकटे किंवा फारतर जोडीने फिरतानाच दिसतात. इतर पक्ष्यांमधे आणि जास्त करून पाणपक्ष्यांमधे त्यांच्या पंखांवर तैलग्रंथी असतात. या ग्रंथींमधून तेलासारखा चिकट द्राव पाझरतो जो त्यांच्या पंखांची नीगा राखायला वापरला जातो. मात्र या कवड्यांमधे अश्या तैलग्रंथींऐवजी वेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात ज्यामधे पावडरसारखा पदार्थ पंखांवर पसरवला जातो जेणेकरून पंख स्वच्छ आणि पिसे मोकळी ठेवली जातात.
कबुतरांप्रमाणेच यांचा विणीचा खास असा काही हंगाम नसतो. वर्षभर, सतत यांची विण सुरूच असते. विणीच्या काळात नर उडून आणि पंखांची विशीष्ट उघडमीट करून मादीला आकर्षीत करतो. जोडी जमल्यावर त्यांचे मिलन होते आणि त्यानंतर नर मादी झाडाच्या फांद्यांच्या बेचक्यामधे काड्यांचा एक पसरट खोलगट वाडग्यासारखा आकार बनवतात. हेच त्यांचे घरटे असते. इतर पक्ष्यांसारखे हे घरटे नक्कीच सुबक, मजबूत आणि सुंदर नसते. या नंतर मादी त्या घरट्यात १/२ पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अंडी उबवण्याचे आणि पुढे नंतर पिल्ले वाढवण्याचे काम दोघेही नर मादी अगदी मन लावून करतात. या कवड्यांची आपल्या पिल्लांना अन्न भरवायची एक खास सवय असते. इतर पक्षी आपल्या पिल्लांना अळ्या, किडे अथवा फळे आणून भरवतात. पण ह्या कवड्यांच्या नर मादी दोघांच्याही गळ्यात असलेल्या खास ग्रंथीमधे दूधासारखा द्राव यावेळी खास तयार होतो. त्यांची बारकी पिल्ले आई,बाबांच्या चोचीत चोच घालून हा द्राव पितात आणि मग त्यांची वाढ झपाट्याने होते.
भारतात सर्वत्र आणि सहज दिसत असल्यामुळे यांचे छायाचित्रण तसे सहज करता येते. अर्थात याकरता तुमच्याकडे योग्य ते लांब पल्ल्याची लेन्स असलेले कॅमेरा साहित्य लागेल. बऱ्याच वेळेला हे कवडी तारांवर बसत असल्यामुळे त्यांचे छायाचित्रण मी टाळत आलो, पण यावर्षी गीरच्या जंगलात आमच्या हॉटेलच्या अगदी समोर असलेल्या नदीवर हे कवडे सकाळ संध्याकाळ भेट द्यायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात, सागाच्या झाडावर बसलेली त्यांची ही जोडी मला त्यामूळे चांगलीच टिपता आली. गीरच्या किंवा कॉर्बेटच्या जंगलात अनेक वेळा जमिनीवर गवताच्या बिया, दाणे टिपायला अनेक वेळा यांची चांगली छायाचित्रे मिळू शकतात. दिसायला अतिशय रूबाबदार असल्यामुळे यांना पिंजऱ्यात पाळण्यासाठी यांना पकडले जाते. त्याचप्रमाणे यांच्या मांसाकरतासुद्धा त्यांना बऱ्याच वेळेला मारले जाते. यांची संख्या जरी धोकादायक नसली तरी त्यांच्या अवैध शिकारीवर बंदी आणली पाहिजे. पिंजऱ्यात या देखण्या पक्ष्याला बंदिस्त करण्यापेक्षा त्याला खुल्या निसर्गात मिरवताना बघायला किंवा त्यांचे असे एखादे छानसे छायाचित्र मिळवायला आपल्याला नक्कीच आवडेल.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

स्वर्गीय नर्तक.
अतिशय देखणा आणि नावाला साजेसा असणारा हा पक्षी दिसावा हे प्रत्येक पक्षी निरीक्षकाचे स्वप्न असते. एकदा का तो दिसला की त्याची नजाकत खरोखरच मनात कायम ठसणारी असते. या पक्ष्याची मादी अगदी बुलबुलासारखी असते आणि त्यांच्या एकंदर सवयीसुद्धा त्याच्याच सारख्या असतात. फक्त त्यांचा रंग वीटकरी, तांबुस असतो आणि डोक्यावर काळाशार लांब तुरा असतो. या मादीचे गळा आणि पोट राखाडी असते. या जातीतील नर पक्षी हा अतिशय देखणा असतो. हा नर साधारणत: २० सें.मी. एवढा मोठा असतो पण त्याची शेपटीच त्याच्या शरीराच्या दुप्पट लांब असते. त्याचे डोके आणि लांबलचक तुरा हे जर्द काळ्याशार चमकदा रंगाचे असते. डोळ्याभोवती आकर्षक निळ्या रंगाची कडी असते. बाकी सगळे शरीर हे शुभ्र चमकदार, चंदेरी पांढऱ्या रंगाचे असते आणि म्हणूनच या हिंदीमधे "दूधराज" असे समर्पक नाव आहे. याची शेपटी गोलाकार असते आणि त्यातली मधली दोन पिसे अतिशय लांब आणि एखाद्या रिबीनीसारखी तरळत असतात. या जातीचे तरूण नर मादीच्याच रंगाचे तांबूस, विटकरी रंगाचे असतात आणि त्यांच्या वयाची ३ वर्षे पुर्ण झाल्यावर त्यांना हा पांढरा रंग येतो. कित्येकदा तर जंगलात अर्धा रंग पांढरा आणि अर्धा रंग तांबूस विटकरी असे सुद्धा नर बघायला मिळतात.
याचे इंग्रजी नाव पॅराडाईज फ्लायकॅचर आहे आणि या नावाप्रमाणेच ते जंगलात कायम हवेत उड्या मारून, सूर मारून, पटकन हवेतल्या हवेत कोलांट्या मारत माश्या, किटक, फुलपाखरे पकडत असतात. हा सुंदर पक्षी भारतात सर्वत्र सहज आढळतो. दाट जंगलांमधे थोड्या उघड्यावर, पाण्याच्या आजूबाजूला यांची वर्दळ कायम असते. यांचा विणीचा हंगाम साधारणत: मार्च ते जुलै महिन्यात असतो. या काळात नर हे हद्दप्रिय असतात आणि त्यांची घरट्याची जागा जिवापाड जपतात. या काळात ते मादीला खास शिळ घालून आळवतात. अर्थात या कामी त्यांची आकर्षक लांब शेपटीसुद्धा कामी येते. नर मादीची जोडी जमल्यावर दोघे मिळून घरटे बांधतात. हे घरटे सहसा जमिनीपासून ६/८ फुटांवर बांधले जाते. दोन तीन काटक्यांमधे उभा कपसारखा घट्ट विणीव गोल बांधला जातो. या घरट्याला मुलायमपणा येण्यासाठी कोळ्याच्या जाळ्याचे तंतू, रेषमासारखे धागे वापरले जातात. मादी त्यात ३/५ पांढरट, गुलबट अंडी घालते. ही अंडी उबवण्याचे आणि पिल्लांचे पालनपोषण दोघेही नर मादी करतात.
हा इतका देखणा पक्षी आहे की दरवेळी त्याला बघतच रहावे असेच वाटत राहीले त्यातून हा भयंकर लाजरा बुजरा असल्यामुळे त्याचे आजपर्यंत काही माझ्याकडून छायाचित्रण झाले नव्हते. याला अनेक जंगलांमधे वेगवेगळ्या अवस्थांमधे बघितले होते पण छायाचित्रणाचा मोका मात्र आता पावसाळ्यात ताडोबाच्या जंगलात मिळाला. ताडोबाला आमच्या गाईडने सांगीतले की त्याने याचे घरटे बघीतले आहे. खरेतर याच्या घरट्याचा हंगाम उलटून गेला होता, तरीसुद्धा म्हटले की असेल एखादा "लेट लतीफ". आम्ही त्या गाईडसोबत त्या जागेवर पोहोचलो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने ३ दिवसाआधी तेथे ३ अंडी बघितली होती. आम्ही पोहोचलो तर तिथे घरटे तर होते पण त्यात कोणीच नर मादी दिसले नाहीत. आम्ही निराश होऊन परत फिरणार तर वरती जांभळीवर त्यांचा ओळखीचा आवाज आला. मादी वरती बसून आम्हालाच न्याहाळत होती आणि चक्क तीच्या तोंडात किडा होता. याचा अर्थ या तीन दिवसात अंड्यातून पिल्ले बाहेर आली होती. आम्ही जीप सुरक्षीत, लांब अंतरावर उभी केली आणि वाट पहात बसलो. ती मादी पटकन घरट्यावर आली, आतून एक इवलीशी चोच बाहेर आली त्यात तिने तो किडा भरवला आणि पटकने ती उडून गेली. आम्ही थोडावेळ अजून वाट बघत राहिलो. त्यानंतरच्या खेपेमधे चक्क तांबूस, लांब शेपटीचा नर आला होता. आजूबाजूच्या बांबूच्या बनात ते इकडे तिकडे उडून माश्या धरत होते आणि पिल्लांना भरवत होते. आमच्य दोन दिवसाच्या मुक्कामामधे आम्हाला त्यांचे मनसोक्त निरिक्षण आणि छायाचित्रण करता आले. आता फक्त पुर्ण वाढलेला चंदेरी, पांढरा नर कधी छायाचित्रे काढायची संधी देतोय याचीच वाट बघत रहायची.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

माळटीटवी.
नेहेमी आढळणाऱ्या टीटवीची ही भारतात सापडणारी दुसरी जात. साधी टीटवी ही पाणथळ जागी हमखास सापडते तर ही माळटीटवी कोरड्या प्रदेशातील माळरानांवर पण पाण्याच्याच आसपास आढळते. आकाराने ही टीटवी साध्या टीटवीपेक्षा थोडी लहान असते. हीच्या पंखांचा आणि पाठीचा रंग मातकट तपकीरी असुन पोट मात्र पांढरेशुभ्र असते. हीला सहज ओळखायची खुण म्हणजे डोळ्यापासून निघून चोचीवरून ओघळणारा पिवळा धम्मक मांसल भाग. ह्यामुळे तीला अगदी दुरूनही सहज ओळखता येते. सहसा ही माळटीटवी आपल्याला एकेकटी किंवा जोडीने दिसतात. पण क्वचीत प्रसंगी आजुबाजुच्या ४/६ टीटव्यासुद्धा एकत्र उडताना दिसू शकतात. हे पक्षी स्थानीक असून एकाच जागी कायम रहातात. त्यांना त्यांची हद्द अतिशय प्रिय असते आणि त्यासाठी ते इतर टीटव्यांबरोबरच दुसऱ्या मोठ्या पक्ष्यांनाही सहज हुसकावून लावतात. हे पक्षी नेहेमी जमिनीवरच आढळतात आणि तुरूतुरू पळत जाउन मातीतील किंवा पानांखाली दडलेले किटक पकडून खातात.
माळ्टीटवीचा विणीचा हंगाम उन्हाळ्यात असतो. नर मादीची जोडी जमल्यावर त्यांचे मिलन होते आणि मादी घरट्यात ४ अंडी घालते. या टीटवीच्या घरट्याला "घरटे" का म्हणायचे ? हा मोठा प्रश्न असतो. कारण जमिनीवर उघड्यावर थोडेफार दगड गोटे रचून त्यात ही अंडी घातली जातात. अंड्यांचा रंग एकदम आजुबाजुला मिळूनमिसळून जाणारा असतो आणि त्यामुळे त्यांचा सहज बचाव होतो. अंडी उबवण्याचे काम दोघेही नर मादी अगदी इमानेइतबारे करतात. जमिनीवर अगदी दबून बसल्यामुळे आणि त्यांचा स्वत:चा रंग सुद्धा आजुबाजुशी मिळता जुळता असल्यामुळे ते अंडी उबवायला बसले आहेत हेच त्यांच्या भक्षकांना जाणवत नाही. तळपत्या उन्हात कित्येक तास ते तसेच अंडी उबवत बसलेले असतात. या तळपत्या उन्हाचा जर त्यांना जास्तच त्रास वाटला किंवा त्यांना आढळून आले की त्यांच्या अंड्यांचे तापमान जरूरीपेक्षा जास्त झाले आहे तर ते जवळपासच्या पाणवठ्यावर जाउन आपली छाती, पोटाजवळची पिसे पाण्याने ओली करतात आणि त्या ओल्या पोटानेच अंड्यांवर परत उबवायला बसतात. यामुळे त्यांच्या अंड्यांना योग्य तो थंडावा मिळतो.
त्यांचा स्वत:चा रंग आणि अंड्यांचा रंग त्यांना आजुबाजुच्या वातावरणात अगदी मिसळवून टाकणारा असला तरी कधी कधी त्यांचा सुगावा शत्रुला लागतोच. त्यावेळी ती टीटवी घरट्यापासून थोडे लंगडत, लडखडत दूर चालत चालत जाते किंवा थोडे दूर उडून बसते. भक्षक त्यांच्याकडे सरकला की ते थोडे पुढे अजुन उडत उडत जाउन बसतात. असे त्याला हळूहळू फसवून घरट्यापासुन अगदी लांबवर नेउन ते परत एकदम चकवा देउन उडत मुळ जागी येउन घरट्यात शांतपणे अंडी उबवायला बसतात.
खरेतर जमिनीवरची कीडा, मुंगी, वाळवी खाउन हे पक्षी आपल्याला मदतच करत असतात पण आपण मात्र नाहक त्यांना अशुभ मानत आलो आहोत. दोन्ही प्रकारच्या टीटव्या या एकदम रूबाबदार आणि देखण्या असतात. त्यामुळे त्यांचे छायाचित्रण नेहेमीच करावेसे वाटते. मागे ताडोबाला गेलो असताना तिथल्या तळ्याच्या काठी आम्हाला एका दिवशी यांची ५/६ वेगवेगळी घरटी दिसली होती. प्रत्येक घरट्याचा आकार हा वेगवेगळा होता आणि त्याचप्रमाणे प्रत्येक घरट्यातील अंड्यांवरची ठिपक्यांची नक्षीसुद्धा वेगवेगळी होती. मात्र त्यावेळेस काही मला त्यांची पिल्ले बघायला मिळाली नव्हती. पण पुढच्याच वर्षी मला कान्हा, बांधवगढच्या जंगलांमधे त्यांच्या अनेक जोड्या पिल्लांसोबत फिरताना आढळल्या. ही पिल्ले त्यांच्या आई पाठोपाठ सतत फिरत असायची. अतिशय उंच काटकुळे पाय आणि अशक्त शरीर यामुळे ती कायम धडपडत असायची. पण त्यांचे पालक अकदम सजग असल्यामुळे ते त्यांची व्यवस्थीत काळजी घ्यायचे. जास्तच मोठा धोका वाटला तर ती पिल्ले जमिनीवरच दबून बसायची, त्यांच्या शरीरावर अगदी अंड्यांप्रमाणेच धब्बे असल्यामुळे ती आजुबाजुच्या दगड मातीत आणि पालापाचोळ्यात मिळून मिसळून जायची.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

रंगीबेरंगी नवरंग.
पावसाळा येऊ घातल्याची वर्दी देणाऱ्या पक्ष्यांमधला हा एक देखणा पक्षी. भारतात स्थानीक स्थलांतर करणारा हा नवरंग मे महिन्याच्या सुमारास महाराष्टाला भेट देतो. इतर वेळी जंगलात कधीच न दिसणारा हा पक्षी दिसायला लागला की समजावे हळूहळू आता पाउस हमखास येणार. इंग्रजीमधे याला इंडियन पिट्टा असे म्हणतात तर मराठीत याला नवरंग म्हणतात. याचा आकार साधारणत: मैने एवढा असतो पण ह्याची शेपुट एकदम आखुड असते किंवा जवळपास नसतेच. हा सहसा जंगलामधे जमिनीवर पालापाचोळ्यामधे किड्यांकरता उलथापालथ करताना दिसतो. या पालापाचोळ्याखाली दडलेल्या अळ्या, मुंग्या इतर किटक यांना पकडून तो खातो. याकरता त्याच्या जाडसर चोचीने तो पानांची बरीच उलथापालथ करताना दिसतो. त्याचे दणकट असणारे पायही त्याला या कामात खुप मदत करतात. या दणकट पायांमुळेच त्याला जमिनीवर उड्या मारत चालता येते. याचे डोके फिकट पिवळसर रंगाचे असते आणि त्याच रंगाचे पोट असते. चोचीपासून मागे डोळ्यावर अगदी मानेपर्यंत काळी गडद पट्टी असते. पंख गडद हिरवे असून त्यावर एक आकाशी निळा ठिपका दिसतो. उडताना या हिरव्या, निळ्या रंगाच्या अजुन थोड्या छटा दिसतात. गळ्याखाली पांढरा रंग असतो तर शेपटीखाली आणि पोटाच्या शेवटी जर्द लाल रंग दिसतो. एवढा हा रंगीबेरंगी पक्षी असल्यामुळेच ह्याचे नाव "नवरंग" सार्थ ठरते.
रात्री जरी हे झाडावर रहात असले तरी दिवसा यांचा वावर जमिनीवरच जास्त असतो. दाट जंगलांमधे हा पक्षी पटकन दिसण्यापेक्षा याचे ओरडणेच लवकर ऐकू येते. अतिशय लांब दुहेरी असणारा हा आवाज "व्हिट ट्यू" किंवा "व्हिट व्यू" असा असतो. यांचा विणीचा हंगाम हा पावसाळ्यात असून साधारणत: जुन ते ऑगस्ट महिन्यापर्यंत हे घरटी बनवून अंडी देतात. जुन्या नोंदींप्रमाणे हे पक्षी हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलांमधे घरटी करायचे. पन सध्या झालेल्या अभ्यासानुसार हे अगदी गोव्यापर्यंतसुद्धा घरटी करताना आढळले आहेत. यांचे घरटे गोलाकार असुन ते सहसा गवतापासुन आणि काटक्यांपासुन बनवलेले असते. सहसा ते जमिनीवर किंवा झुडुपामधे अगदी खालच्या पातळीवर असते. मादी घरट्यामधे ४/५ अंडी घालते. ही अंडी अगदी गोल असून त्यांचा रंग पांढराशुभ्र असतो आणि त्यावर लालसर, जांभळे ठिपके किंवा चट्टे असतात.
खरेतर हा पक्षी अगदी दाट जंगलांमधला आहे पण ह्याला मी जंगलांपेक्षा ठाणा, मुंबईच्या शहरातच जास्त बघित्ला आहे. ठाणे शहरात अगदी गर्दिने गजबजलेल्या भागात हा आंब्यासारख्या दाट झाडावर मे, जुन महिन्यात हमखास दिसणार. त्यातला एखाद दुसरा व्रात्य कावळ्यांच्या दादागीरीला घाबरून एकतर घरात शीरणार किंवा खाली गाड्यांच्या गर्दीत रस्त्यावर उतरणार. ह्या जखमी, घाबरलेल्या नवरंगांना नंतर सावकाश, सुरक्षीत जंगलात सोडून देण्याची जबाबदारी आम्हा पक्षीमित्रांना या काळात नित्याचीच असते. अर्थात अश्यावेळी त्यांचे नैसर्गिक छायाचित्रण काही शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक छायाचित्रणासाठी परत जंगलात हे जावेच लागते. यावेळी कान्हा, बांधवगढ या दोन्ही जंगलांमधे आम्हाला हे नवरंग बऱ्याच वेळेला दिसले. काही जोड्या त्यांच्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे पालापाचोळयाखाली दडलेल्या अळ्या उकरून काढण्यात दंग होत्या. पण त्यावेळी ते कायम झाडाझुडूपात असल्यामुळे त्यांची चांगली छायाचित्रे काही मिळाली नव्हती. नंतर मात्र बांधवगढला एका जोडीचे घरटे बांधणीचे काम सुरू झालेले आम्हाला आढळले. आपल्या शरीरापेक्षा अगडबंब काडी घेउन ती बराच वेळ इकडे तिकडे उडत होती. त्यामुळे तीचे व्यवस्थीत छायाचित्रण करता आले. वेळेअभावी आम्हला त्यांचे घरटे काही सापडू शकले नाही. मात्र आता माझ्या ऑगस्ट महिन्यातील ताडोबाच्या जंगल सफारीत ह्या नवरंगाचे किंवा इतर पक्ष्यांची घरटी शोधायचा विचार जरूर आहे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

गीर्रे "बाज".
आपल्याकडे ३/४ जातींचे बाज पक्षी दिसत असले तरी त्यातील हे मधुबाज आणि पांढऱ्या डोळ्यांचा बाज त्यातल्या त्यात सहज दिसतात. शिकारी पक्ष्यांमधे मोडणाऱ्या या पक्ष्यांना अर्थातच त्यांचे खास बाकदार, अणुकुचीदार चोच, दमदार लांब तिक्ष्ण नख्या असलेले पाय आणि शक्तीमान पंख लाभले आहेत. यातील पांढऱ्या डोळ्यांचा बाज हा साधरणत: साध्या घारीच्या आकाराएवढा मोठा असतो. त्याचा गळा पांढरा असून त्याच्या बाजूला दोन काळ्या रेघा असतात. बाकीचे शरीर साधारणत: डद फिकट तपकीरी असते. पंखांवर थोडी पिंगट झाक असते. याचे डोळे मात्र अगदी पांढरे किंवा पिवळसर असतात आणि इतर पक्ष्यांपेक्षा सहज वेगळे ओळखता येतात.
याचाच चुलतभाऊ आहे मधुबाज. इंग्रजीमधे याला "ओरीएंटल हनी बझार्ड" असे जरी म्हणत असले तरी त्यांच्या सवयी या घारीसारख्या जास्त असतात. यांची मान लांब असते आणि डोके काहीसे छोटे असते. इतर शिकारी पक्ष्यांच्या तुलनेने ते त्यांचे लहान डोके फारच क्षुद्र वाटते, किंबहुना त्याचा आकार तर एखाद्या कबुतराच्या डोक्यासारखा असतो. नरांच्या डोक्याचा रंग राखाडी असतो तर माद्यांच्या डोक्याचा रंग तपकीरी असतो. मादी ही नरापेक्षा आकाराने जास्त मोठी असते आणि तीचा रंगसुद्धा जास्त गडद असतो. या पक्ष्याचा डोक्यावर एक छोटासा तुरा असतो. शेपटी लांब असून नराची शेपुट काळी असते आणि त्यावर पांढरा पट्टा असतो. या पक्ष्यांना हनी बझार्ड अथवा मधुबाज म्हणायचे कारण म्हणजे त्यांचे मुख्य खाणे हे मधमाश्या आणि इतर गांधीलमाश्या असते. अतिशय शिताफीने ते एखाद्या पोळ्यावर झडप घालता आणि आतील मधमाश्या, त्यांची अंडी, अळ्या, कोष, मध व घरट्याचा भाग खातात. मधमाश्या चावू नये म्हणून त्यांच्या पायाचे खास टणक खवले असतात. त्यांच्या चोचीजवळची पिसेसुद्धा काहीशी कठीण असतात त्यामुळे त्या तीथे मधमाश्या दंश करू शकत नाहीत. त्यांचे पाय आणि नख्या ही अशा प्रकारची पोळी, घरटी फोडण्यासाठी खास बनलेले असतात. या त्यांच्या खाण्याबरोबरच त्यांना नाकतोडे किंवा इतर किटक, पक्ष्यांची अंडी, छोटे पक्षी, बेडूक हे सुद्धा अन्न म्हणून चलते. हे पक्षी स्थलांतर करतात आणि हिवाळ्यात जेंव्हा त्यांच्या प्रदेशात खाणे कमी असते आणि कडाक्याची थंडी असते त्यावेळेस ते दक्षीणेकडे प्रवास करतात.
इतर सर्व शिकारी पक्ष्यांप्रमाणेच हे सुद्धा दाट जंगलांमधे रहाणारे आणि अतिशय लाजरेबुजरे असतात. आतापर्यंत हे पांढऱ्या डोळ्यांचे बाज अतिशय लांब लांब आणि दुर्बिणीतून बघितले होते किंवा त्यांचे एकदम लांबून छायाचित्रण केले होते. मात्र या वेळी पावसाळ्यात ताडोबाच्या जंगलामधे हा पांढऱ्या डोळ्याचा बाज आमच्या जीपबरोबर अगदी रस्त्यालगत उडत होता. मधेच तो झाडाच्या अगदी खालच्या फांदीवर बसायचा आणि मग रस्त्यावर उतरून खायला काही किटक शोधायचा. एकदा तर तो चक्क रस्त्याजवळ असलेल्या मचाणाच्या लाकडी शीडीवर बसला आणि त्यामुळे त्याची जवळून आणि अगदी "आय लेव्हल"ला छायाचित्रे मिळाली. भरतपूरला दिसलेला मधुबाज हा तरूण पक्षी होता. त्याला त्याचे पुर्ण वाढल्या नंतर येणारे रंग आले नव्हते. उंच झाडावर बसून तो आम्हाला डोके वळवून वळवून बघत होता. भरतपूरच्या जंगलामधे सायकलने, पायी फिरायची परवानगी असल्यामुळे त्याच्या झाडाखाली उतरून आम्हाला त्याचे चारी बाजूने सहज छायाचित्रण करता आले. तो सुद्धा दरवेळेस अगदी चौकसपणे आमच्याकडे बघत होता. कान्हाचा जंगलात आम्ही एका पाणवठ्यावर जंगली प्राण्यांची वाट बघत थांबलो असताना शेजारच्या झाडावर हा देखणा पक्षी येउन उतरला. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्याने त्याच्या पंखांची सावकाश साफसुफ केली. त्यानंतर त्याने परत हवेत उड्डाण केले आणि वर तरळत, घिरट्या घालत तो निघून गेला. शिकारी पक्ष्यांचे इतक्या जवळून दर्शन आणि छायाचित्रण मात्र नक्कीच नशिबाने घडते.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

खाटकाचा दरारा.
हिवाळा सरत आला की आपल्याकडे हे पक्षी दिसायला लागतात. थोडेसे शहराच्या बाहेर गेलो की माळरानांवर, गवताळ प्रदेशात हा पक्षी झाडांवर अथवा टेलीफोनच्या तारेवर बसलेला हमखास दिसणार. हा पक्षी उत्तम शिकारी असला तरी "शिकारी" पक्ष्यांच्या गटात अथवा "बर्डस ऑफ प्रे" या गटात येत नाही आणि तसा दिसतही नाही. आकाराने त्यांच्यापेक्षा बराच लहान म्हणजे आपल्या बुलबुलापेक्षा थोडासाच मोठा असतो. हा पक्षी सहसा एकेकटाच रहातो. काळा, पांढरा आणि पिवळसर गुलाबी असे रंग प्रमुख्याने याच्या पिसांचे असतात. याच्या पंखांची टोके आणि शेपटी काळसर असते. डोके, मा आणि पाठीचा वरचा काही भाग राखाडी असतो. पोट आणि छाती पांढरीशुभ्र असते. पंखाखाली आणि छातीवर काही ठिकाणी पिवळसर, गुलबट आकर्षक रंग असतो. याला ओळखायची सर्वात महत्वाची खुण म्हणजे याच्या डोक्यावर असणारी एखाद्या गॉगलप्रमाणे भासणारी काळी पट्टी. यामुळे हा पक्षी एकदम डौलदार दिसतो.
खाटीक हा नावाप्रमाणेच क्रुर पक्षी आहे. शिकार करण्यात याचा हातखंडा असल्यामुळे त्यासाठी लागणारी अणुकुचीदार चोच आणि बळकट पाय आणि नख्या त्याच्याकडे असतात. त्याच्या हालचालीही सावध, चपळ आणि चलाख असतात. असा हा रंगीत खाटीक पक्षी शिकारी भासतो तो त्याच्या चोच पाहील्यावरच. छोटीशी असणारी ही चोच टोकाला मात्र एकदम वळलेली आणि बाकदार असते. यामुळेच त्याने पकडलेले भक्ष्य तो सहज फाडू शकतो आणि त्याचे तुकडे करू शकतो. तो अनेक पक्ष्यांना, किटकांना, प्राण्यांना मारून बाभळीच्या किंवा इतर काटेरी झाडांना अडकवून ठेवतो. अगदी एखादा खाटीक जसा आपल्या दुकानात मारलेले बोकड टांगतो तसाच हा ते किटक, पक्षी टांगतो म्हणूनच याचे नाव खाटीक सार्थ ठरते. याच्या तावडीत सापडलेली शिकार सहसा त्याच्या बाकदार चोचीतून सुटत नाही. प्राणी जर मोठा असेल तर तो त्याला त्याच्या शक्तीमान पंज्यात धरून ठेवतो आणि हळूहळू चोचीने त्याचे लचके तोडतो. याच्या अन्नात मुख्यत: टोळ, बेडूक, छोटे पक्षी आणि उंदरासारखे लहान प्राणीसुद्धा असतात. लहान झुडपावरच तो गवाताचा, कापसाचा छोटासा ढिग बनवून त्याचे घरटे बांधतो. मादी अंदाजे मार्च महिन्याच्या सुमारास या घरट्यात ३ ते ६ अंडी घालते. नर मादी अगदी जोडीने या अंड्यांची आणि नंतर पिल्लांचे देखभाल करतात. आपल्याकडे हा लांब शेपटीचा खाटीक सरार्स दिसत असला तरी त्याची जंगलातील वूड श्राईक ही जातसुद्धा दिसते. याच प्रमाणे खुरट्या आणि शुष्क प्रदेशात राखाडी रंगाचे यांचे भाउबंद दिसतात.
स्थानीक स्थलांतर करणारे हे पक्षी असल्यामुळे आपल्याकडे वर्षातील काही काळच ते आपल्याला दिसतात. त्यामुळे यांचे जर का छायाचित्रण करायचे असेल तर आपल्याला हा काळ कोणता आहे हे जाणून त्यांचे छायाचित्रण करावे लागेल. तसा हा सर्वसामान्य दिसणारा पक्षी असल्यामुळे सबंध भारतभर दिसतो. मात्र उघड्या जंगलात रहाणारा असल्यामुळे तो काहीसा लाजराबुजरा आहे. याच कारणामुळे तो आपल्याला छायाचित्रणासाठी फारसा जवळ येउ देत नाही. मागे भरतपूर पक्षी अभयारण्यात डिसेंबर महिन्यात गेलो असताना आम्हाला हा खाटीक पक्षी अगदी उघद्यावर जवळच्याफांदीवर दिसला. पण अतिशय कडाक्याची थंडी असल्यामुळे तो सुद्धा गारठला होता आणि आम्हीसुद्धा. त्यात प्रचंड धुके पसरल्यामुळे त्यांचे रंगसुधा नीट दिसत नव्हते. त्यामुळे अगदी समोर आणि उघड्यावर असुनसुद्धा त्याचे छायाचित्रण काही शक्य झाले नाही. त्यानंतर या खाटीक पक्ष्याचे मी छायाचित्रण अनेक वेगवेगळ्या जंगलात केले. कधी कधी ते फार लांबून करावे लागले तर कधी कधी ते अगदी जवळून करायचीसुद्धा संधी मिळाली. जीम कॉर्बेटच्या जंगलात एक खाटीक पक्ष्याने मोठ्या टोळाची शिकार करताना बघितले पण बहुतेक त्याला जोरदार भूक लागल्यामुळे त्याने त्या टोळाला लगेच खाऊन टाकले. त्यामुळे आता बाभळीच्या काट्यावर कुठेतरी लटकावलेला टोळ, बेडूक आणि बाजूला तो खाटीक पक्षी असे छायाचित्र कधी मिळेल याचीच वाट बघत रहायचे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/