Wednesday, January 13, 2010

माळटीटवी.
नेहेमी आढळणाऱ्या टीटवीची ही भारतात सापडणारी दुसरी जात. साधी टीटवी ही पाणथळ जागी हमखास सापडते तर ही माळटीटवी कोरड्या प्रदेशातील माळरानांवर पण पाण्याच्याच आसपास आढळते. आकाराने ही टीटवी साध्या टीटवीपेक्षा थोडी लहान असते. हीच्या पंखांचा आणि पाठीचा रंग मातकट तपकीरी असुन पोट मात्र पांढरेशुभ्र असते. हीला सहज ओळखायची खुण म्हणजे डोळ्यापासून निघून चोचीवरून ओघळणारा पिवळा धम्मक मांसल भाग. ह्यामुळे तीला अगदी दुरूनही सहज ओळखता येते. सहसा ही माळटीटवी आपल्याला एकेकटी किंवा जोडीने दिसतात. पण क्वचीत प्रसंगी आजुबाजुच्या ४/६ टीटव्यासुद्धा एकत्र उडताना दिसू शकतात. हे पक्षी स्थानीक असून एकाच जागी कायम रहातात. त्यांना त्यांची हद्द अतिशय प्रिय असते आणि त्यासाठी ते इतर टीटव्यांबरोबरच दुसऱ्या मोठ्या पक्ष्यांनाही सहज हुसकावून लावतात. हे पक्षी नेहेमी जमिनीवरच आढळतात आणि तुरूतुरू पळत जाउन मातीतील किंवा पानांखाली दडलेले किटक पकडून खातात.
माळ्टीटवीचा विणीचा हंगाम उन्हाळ्यात असतो. नर मादीची जोडी जमल्यावर त्यांचे मिलन होते आणि मादी घरट्यात ४ अंडी घालते. या टीटवीच्या घरट्याला "घरटे" का म्हणायचे ? हा मोठा प्रश्न असतो. कारण जमिनीवर उघड्यावर थोडेफार दगड गोटे रचून त्यात ही अंडी घातली जातात. अंड्यांचा रंग एकदम आजुबाजुला मिळूनमिसळून जाणारा असतो आणि त्यामुळे त्यांचा सहज बचाव होतो. अंडी उबवण्याचे काम दोघेही नर मादी अगदी इमानेइतबारे करतात. जमिनीवर अगदी दबून बसल्यामुळे आणि त्यांचा स्वत:चा रंग सुद्धा आजुबाजुशी मिळता जुळता असल्यामुळे ते अंडी उबवायला बसले आहेत हेच त्यांच्या भक्षकांना जाणवत नाही. तळपत्या उन्हात कित्येक तास ते तसेच अंडी उबवत बसलेले असतात. या तळपत्या उन्हाचा जर त्यांना जास्तच त्रास वाटला किंवा त्यांना आढळून आले की त्यांच्या अंड्यांचे तापमान जरूरीपेक्षा जास्त झाले आहे तर ते जवळपासच्या पाणवठ्यावर जाउन आपली छाती, पोटाजवळची पिसे पाण्याने ओली करतात आणि त्या ओल्या पोटानेच अंड्यांवर परत उबवायला बसतात. यामुळे त्यांच्या अंड्यांना योग्य तो थंडावा मिळतो.
त्यांचा स्वत:चा रंग आणि अंड्यांचा रंग त्यांना आजुबाजुच्या वातावरणात अगदी मिसळवून टाकणारा असला तरी कधी कधी त्यांचा सुगावा शत्रुला लागतोच. त्यावेळी ती टीटवी घरट्यापासून थोडे लंगडत, लडखडत दूर चालत चालत जाते किंवा थोडे दूर उडून बसते. भक्षक त्यांच्याकडे सरकला की ते थोडे पुढे अजुन उडत उडत जाउन बसतात. असे त्याला हळूहळू फसवून घरट्यापासुन अगदी लांबवर नेउन ते परत एकदम चकवा देउन उडत मुळ जागी येउन घरट्यात शांतपणे अंडी उबवायला बसतात.
खरेतर जमिनीवरची कीडा, मुंगी, वाळवी खाउन हे पक्षी आपल्याला मदतच करत असतात पण आपण मात्र नाहक त्यांना अशुभ मानत आलो आहोत. दोन्ही प्रकारच्या टीटव्या या एकदम रूबाबदार आणि देखण्या असतात. त्यामुळे त्यांचे छायाचित्रण नेहेमीच करावेसे वाटते. मागे ताडोबाला गेलो असताना तिथल्या तळ्याच्या काठी आम्हाला एका दिवशी यांची ५/६ वेगवेगळी घरटी दिसली होती. प्रत्येक घरट्याचा आकार हा वेगवेगळा होता आणि त्याचप्रमाणे प्रत्येक घरट्यातील अंड्यांवरची ठिपक्यांची नक्षीसुद्धा वेगवेगळी होती. मात्र त्यावेळेस काही मला त्यांची पिल्ले बघायला मिळाली नव्हती. पण पुढच्याच वर्षी मला कान्हा, बांधवगढच्या जंगलांमधे त्यांच्या अनेक जोड्या पिल्लांसोबत फिरताना आढळल्या. ही पिल्ले त्यांच्या आई पाठोपाठ सतत फिरत असायची. अतिशय उंच काटकुळे पाय आणि अशक्त शरीर यामुळे ती कायम धडपडत असायची. पण त्यांचे पालक अकदम सजग असल्यामुळे ते त्यांची व्यवस्थीत काळजी घ्यायचे. जास्तच मोठा धोका वाटला तर ती पिल्ले जमिनीवरच दबून बसायची, त्यांच्या शरीरावर अगदी अंड्यांप्रमाणेच धब्बे असल्यामुळे ती आजुबाजुच्या दगड मातीत आणि पालापाचोळ्यात मिळून मिसळून जायची.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

No comments:

Post a Comment