Wednesday, January 13, 2010

स्वर्गीय नर्तक.
अतिशय देखणा आणि नावाला साजेसा असणारा हा पक्षी दिसावा हे प्रत्येक पक्षी निरीक्षकाचे स्वप्न असते. एकदा का तो दिसला की त्याची नजाकत खरोखरच मनात कायम ठसणारी असते. या पक्ष्याची मादी अगदी बुलबुलासारखी असते आणि त्यांच्या एकंदर सवयीसुद्धा त्याच्याच सारख्या असतात. फक्त त्यांचा रंग वीटकरी, तांबुस असतो आणि डोक्यावर काळाशार लांब तुरा असतो. या मादीचे गळा आणि पोट राखाडी असते. या जातीतील नर पक्षी हा अतिशय देखणा असतो. हा नर साधारणत: २० सें.मी. एवढा मोठा असतो पण त्याची शेपटीच त्याच्या शरीराच्या दुप्पट लांब असते. त्याचे डोके आणि लांबलचक तुरा हे जर्द काळ्याशार चमकदा रंगाचे असते. डोळ्याभोवती आकर्षक निळ्या रंगाची कडी असते. बाकी सगळे शरीर हे शुभ्र चमकदार, चंदेरी पांढऱ्या रंगाचे असते आणि म्हणूनच या हिंदीमधे "दूधराज" असे समर्पक नाव आहे. याची शेपटी गोलाकार असते आणि त्यातली मधली दोन पिसे अतिशय लांब आणि एखाद्या रिबीनीसारखी तरळत असतात. या जातीचे तरूण नर मादीच्याच रंगाचे तांबूस, विटकरी रंगाचे असतात आणि त्यांच्या वयाची ३ वर्षे पुर्ण झाल्यावर त्यांना हा पांढरा रंग येतो. कित्येकदा तर जंगलात अर्धा रंग पांढरा आणि अर्धा रंग तांबूस विटकरी असे सुद्धा नर बघायला मिळतात.
याचे इंग्रजी नाव पॅराडाईज फ्लायकॅचर आहे आणि या नावाप्रमाणेच ते जंगलात कायम हवेत उड्या मारून, सूर मारून, पटकन हवेतल्या हवेत कोलांट्या मारत माश्या, किटक, फुलपाखरे पकडत असतात. हा सुंदर पक्षी भारतात सर्वत्र सहज आढळतो. दाट जंगलांमधे थोड्या उघड्यावर, पाण्याच्या आजूबाजूला यांची वर्दळ कायम असते. यांचा विणीचा हंगाम साधारणत: मार्च ते जुलै महिन्यात असतो. या काळात नर हे हद्दप्रिय असतात आणि त्यांची घरट्याची जागा जिवापाड जपतात. या काळात ते मादीला खास शिळ घालून आळवतात. अर्थात या कामी त्यांची आकर्षक लांब शेपटीसुद्धा कामी येते. नर मादीची जोडी जमल्यावर दोघे मिळून घरटे बांधतात. हे घरटे सहसा जमिनीपासून ६/८ फुटांवर बांधले जाते. दोन तीन काटक्यांमधे उभा कपसारखा घट्ट विणीव गोल बांधला जातो. या घरट्याला मुलायमपणा येण्यासाठी कोळ्याच्या जाळ्याचे तंतू, रेषमासारखे धागे वापरले जातात. मादी त्यात ३/५ पांढरट, गुलबट अंडी घालते. ही अंडी उबवण्याचे आणि पिल्लांचे पालनपोषण दोघेही नर मादी करतात.
हा इतका देखणा पक्षी आहे की दरवेळी त्याला बघतच रहावे असेच वाटत राहीले त्यातून हा भयंकर लाजरा बुजरा असल्यामुळे त्याचे आजपर्यंत काही माझ्याकडून छायाचित्रण झाले नव्हते. याला अनेक जंगलांमधे वेगवेगळ्या अवस्थांमधे बघितले होते पण छायाचित्रणाचा मोका मात्र आता पावसाळ्यात ताडोबाच्या जंगलात मिळाला. ताडोबाला आमच्या गाईडने सांगीतले की त्याने याचे घरटे बघीतले आहे. खरेतर याच्या घरट्याचा हंगाम उलटून गेला होता, तरीसुद्धा म्हटले की असेल एखादा "लेट लतीफ". आम्ही त्या गाईडसोबत त्या जागेवर पोहोचलो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने ३ दिवसाआधी तेथे ३ अंडी बघितली होती. आम्ही पोहोचलो तर तिथे घरटे तर होते पण त्यात कोणीच नर मादी दिसले नाहीत. आम्ही निराश होऊन परत फिरणार तर वरती जांभळीवर त्यांचा ओळखीचा आवाज आला. मादी वरती बसून आम्हालाच न्याहाळत होती आणि चक्क तीच्या तोंडात किडा होता. याचा अर्थ या तीन दिवसात अंड्यातून पिल्ले बाहेर आली होती. आम्ही जीप सुरक्षीत, लांब अंतरावर उभी केली आणि वाट पहात बसलो. ती मादी पटकन घरट्यावर आली, आतून एक इवलीशी चोच बाहेर आली त्यात तिने तो किडा भरवला आणि पटकने ती उडून गेली. आम्ही थोडावेळ अजून वाट बघत राहिलो. त्यानंतरच्या खेपेमधे चक्क तांबूस, लांब शेपटीचा नर आला होता. आजूबाजूच्या बांबूच्या बनात ते इकडे तिकडे उडून माश्या धरत होते आणि पिल्लांना भरवत होते. आमच्य दोन दिवसाच्या मुक्कामामधे आम्हाला त्यांचे मनसोक्त निरिक्षण आणि छायाचित्रण करता आले. आता फक्त पुर्ण वाढलेला चंदेरी, पांढरा नर कधी छायाचित्रे काढायची संधी देतोय याचीच वाट बघत रहायची.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

No comments:

Post a Comment