Wednesday, January 13, 2010

ठिपकेवाला कवडा.
आपल्या शहरात, गावात दिसणारी राखाडी रंगाची कबुतराची जात असते तीचेच हे जंगलातील भाऊबंद. हे जरी जंगलात दिसत असले तरी सर्वसाधारणपणे गावात, थोडे शहराबाहेर अगदी सहज दिसतात. गावाच्या आजुबाजुच्या शेतातील, हमरस्त्याच्या बाजुला असणाऱ्या वीजेच्या अथवा टेलीफोनच्या तारांवर हे पक्षी हमखास बसलेले आढळतात. यांचा आकार अंदाजे कबुतराएवढाच असतो. रंग मात्र आकर्षक गुलबट तपकीरी असुन मानेवर काळ्या रंगाचा मोठा धब्बा असतो आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. यांच्या पंखांवर पण ठिपक्यांची छान नक्षी असते. यांचे पाय कबुतरांसारखेच लालभडक असतात. उडताना यांचे शरीर जास्त फिकट दिसते पण काळसर शेपटीवर पांढऱ्या ठिपक्यांची नक्षी उठून दिसते.
हे पक्षी आपल्याला सर्वत्र आणि सहज दिसतात आणि सहसा रस्त्यावरच दाणे टिपताना आढळतात. गाडी अथवा आपण अगदी जवळ जाईपर्यंत ते बिलकूल उडत नाहित मात्र अगदी शेवटच्या क्षणी भुरकन उडत जाउन परत पुढे थोड्याच अंतरावर जाउन बसतात. यांचे मुख्य अन्न हे गवताच्या बिया, इतर दाणे हे असते त्यामुळे हे आपल्याला रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवतात, शेतांमधे, कुरणांमधे जास्त आढळतात. इतर कबुतरे जशी मोठ्या थव्याने एकत्र असतात तसे हे कवडे मात्र एकेकटे किंवा फारतर जोडीने फिरतानाच दिसतात. इतर पक्ष्यांमधे आणि जास्त करून पाणपक्ष्यांमधे त्यांच्या पंखांवर तैलग्रंथी असतात. या ग्रंथींमधून तेलासारखा चिकट द्राव पाझरतो जो त्यांच्या पंखांची नीगा राखायला वापरला जातो. मात्र या कवड्यांमधे अश्या तैलग्रंथींऐवजी वेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात ज्यामधे पावडरसारखा पदार्थ पंखांवर पसरवला जातो जेणेकरून पंख स्वच्छ आणि पिसे मोकळी ठेवली जातात.
कबुतरांप्रमाणेच यांचा विणीचा खास असा काही हंगाम नसतो. वर्षभर, सतत यांची विण सुरूच असते. विणीच्या काळात नर उडून आणि पंखांची विशीष्ट उघडमीट करून मादीला आकर्षीत करतो. जोडी जमल्यावर त्यांचे मिलन होते आणि त्यानंतर नर मादी झाडाच्या फांद्यांच्या बेचक्यामधे काड्यांचा एक पसरट खोलगट वाडग्यासारखा आकार बनवतात. हेच त्यांचे घरटे असते. इतर पक्ष्यांसारखे हे घरटे नक्कीच सुबक, मजबूत आणि सुंदर नसते. या नंतर मादी त्या घरट्यात १/२ पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अंडी उबवण्याचे आणि पुढे नंतर पिल्ले वाढवण्याचे काम दोघेही नर मादी अगदी मन लावून करतात. या कवड्यांची आपल्या पिल्लांना अन्न भरवायची एक खास सवय असते. इतर पक्षी आपल्या पिल्लांना अळ्या, किडे अथवा फळे आणून भरवतात. पण ह्या कवड्यांच्या नर मादी दोघांच्याही गळ्यात असलेल्या खास ग्रंथीमधे दूधासारखा द्राव यावेळी खास तयार होतो. त्यांची बारकी पिल्ले आई,बाबांच्या चोचीत चोच घालून हा द्राव पितात आणि मग त्यांची वाढ झपाट्याने होते.
भारतात सर्वत्र आणि सहज दिसत असल्यामुळे यांचे छायाचित्रण तसे सहज करता येते. अर्थात याकरता तुमच्याकडे योग्य ते लांब पल्ल्याची लेन्स असलेले कॅमेरा साहित्य लागेल. बऱ्याच वेळेला हे कवडी तारांवर बसत असल्यामुळे त्यांचे छायाचित्रण मी टाळत आलो, पण यावर्षी गीरच्या जंगलात आमच्या हॉटेलच्या अगदी समोर असलेल्या नदीवर हे कवडे सकाळ संध्याकाळ भेट द्यायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात, सागाच्या झाडावर बसलेली त्यांची ही जोडी मला त्यामूळे चांगलीच टिपता आली. गीरच्या किंवा कॉर्बेटच्या जंगलात अनेक वेळा जमिनीवर गवताच्या बिया, दाणे टिपायला अनेक वेळा यांची चांगली छायाचित्रे मिळू शकतात. दिसायला अतिशय रूबाबदार असल्यामुळे यांना पिंजऱ्यात पाळण्यासाठी यांना पकडले जाते. त्याचप्रमाणे यांच्या मांसाकरतासुद्धा त्यांना बऱ्याच वेळेला मारले जाते. यांची संख्या जरी धोकादायक नसली तरी त्यांच्या अवैध शिकारीवर बंदी आणली पाहिजे. पिंजऱ्यात या देखण्या पक्ष्याला बंदिस्त करण्यापेक्षा त्याला खुल्या निसर्गात मिरवताना बघायला किंवा त्यांचे असे एखादे छानसे छायाचित्र मिळवायला आपल्याला नक्कीच आवडेल.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/

No comments:

Post a Comment