Friday, April 9, 2010

दिमाखदार जांभळी पाणकोंबडी.
साधारणत: पाणपक्षी हे जंगलातल्या पक्ष्यांसारखे रंगीबेरंगी नसतात. त्यांचे रंग मातकट, मळखाउ, काळसर असतात. अर्थातच याला ही जांभळी पाणकोंबडी अपवाद आहे. अतिशय गडद निळा, हिरवट, जांभळा रंग या पाणकोंबडीचा असतो. हीची शेपुट आखुड असते आणि चालताना ही शेपुट वर खाली हलवायची तीची सवय असते. यामुळे जेंव्हा जेंव्हा ही शेपुट वर होते तेंव्हा तेंव्हा त्या शेपटीखालचा पांढराशुभ्र कापसासारखा पिसांचा पुंजका नेहेमी नजरेत भरतो. हीची चोच जाड आणि लालभडक असते. चोचीपासून वर कपळापर्यंत एक ढालीसारखा भाग असतो. हा भागसुद्धा लालभडक आणि चकचकीत असतो. हीचे पाय मजबूत लाल, भगवे असतात. पाणपक्षी असल्यामुळे अर्थातच या पाण्यात लिलया पोहू शकतात पण पाण्यात पोहोण्यापेक्षा त्या आजुबाजुला, काठावर दुडकत दुडकत चालणेच जास्त पसंत करतात. मात्र त्यांना जर का अश्या वेळी काही धोका जाणवला तर त्या तिथून उडून दूर जाऊन बसतात. या जांभळ्या पाणकोंबड्या तश्या भारतात सर्वत्र सापडतात. मोठी तळी, धरणांची जलाशये, नद्या या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. आज जगभरात यांच्या १३ उपजाती आढळतात आणि त्या प्रत्येक उपजातीत दिसण्यात, रंगात, आकारात थोडाफार फरक आढळतो.

पाणवनस्पतींचे कोंब, पाणगवताची कोवळी पाने हे या जांभळ्या पाणकोंबडीचे खाणे आहे. पण याचबरोबर ती मासे, बेडूक, गोगलगायी असे छोटे प्राणीही खाते. आजुबाजुला असणाऱ्या दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यामधली अंडी चोरणे, त्यांची पिल्ले पळवणे असे सुद्धा ती प्रसंगी करते. खाताना चोचीने क्ष्य थेट खाण्यापेक्ष्या, तीचे भक्ष्य ती तीच्या लांबलचक पायाच्या पंज्यात पकडून अगदी तो पंजा तोंडापर्य़ंत नेउन मग ते भक्ष्य खाते. यांचा विणीचा हंगाम निश्चीत असला तरी वेगवेगळ्या जागांप्रमाणे आणि पावसाच्या काळाप्रमाणे बदलता असतो. पाणवनस्पतींच्या जंजाळात या जांभळ्या पाणकोंबड्या आपली घरटी करतात. हे घरटे मोठे असते आणि ते या पाणवनस्पतीच्या फांद्यांपासून आणि तिथेच पाण्यात उपलब्ध असणाऱ्या सामानापासून बनवले जाते. पाण्यात तरंगणारे हे घरटे पाण्याच्या पातळीपासून थोडे उंचावरच असते. जांभळ्या पाणकोंबडीचा नर मादीला आकर्षित करण्यासाठी पाणगवताची काडी चोचीत आडवी धरून, मान वर खाली करून तीला साद घालतो. मजेची गोष्ट अशी की जोडी जमली तरी एका मादीशी अनेक नर मिलन करतात. याचमुळे अंडी उबवण्याचे काम अनेक माद्या आणि अनेक वेगवेगळे नर करतात. एवढेच नव्हे तर आधीच्या वर्षी आलेली तरूण पिल्ले सुद्धा या अंड्यांना उबवण्याचे काम अगदी इमानेइतबारे करतात. त्या एकाच घरट्यात अगदी २/३ वेगवेगळ्या माद्यांचीही अंडी असू शकतात. एका विणीची हंगामात मादी दोन वेळासुद्धा अंडी देउन त्यांना वाढवू शकते. या अंड्याचा रंग लालसर, पिवळट असतो आणि त्यावर त्याच गडद रंगाचे ठिपके असतात. एका घरट्यात अंदाजे ३ ते ६ अंडी असतात. अंदाजे २० ते २५ दिवसानंतर अंड्यातून पिल्ल्लू बाहेर येते आणि लगेचच घरट्याच्या बाहेर पडते पण पुढचे २/४ दिवस ते घरट्यात परत येत रहाते. त्याचे रक्षण आणि त्याला अन्न पुरवण्याचे काम पुढचे १०/१२ दिवस त्याचे पालक आणि त्यांचे इतर सहकारी करतात. त्यानंतर मात्र ते पिल्लू स्वत:चे अन्न स्वत:च मिळवते.

या जांभळ्या पाणकोंबड्यांना २२/२३ वर्षांपुर्वी मी प्रथम पाहिले. मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल शहराच्या बाहेरच असलेल्या बल्लाळेश्वराच्या तळ्यात या जांभळया पाणकोंबड्या शेकडोंनी होत्या. आम्ही अगदी पहाटे पहाटे एस.टी. बस पकडून पनवेल ला गेलो आणि महामार्गावरच उतरून दुर्बिणीतून त्या जांभळ्या पाणकोंबडयांना बघितले. भर शहरात, अगदी कायम गजबजलेल्या वाहतूकीच्या मरस्त्याच्या बाजूलाच त्यांचे बागडने अगदी सुखात सुरू होते. इतक्या जवळ आणि तेसुद्धा इतक्या मोठ्या संख्येने ते रंगीबेरंगी पक्षी बघून मन अगदी थक्क झाले. कमळाच्या मोठ्या मोठ्या गोल पानांवर त्याचे खाणे पकडण्यासाठी पळत जाणे, एकमेकांच्या मागे धावपळ करणे, थोडा धोका जाणवला तर पटकन उडून दुसऱ्या भागात उडणे हे खरोखरच मजेशीर होते. त्यानंतर नेहेमी अगदी बसमधून जातानासुद्धा उजव्या खिडकीत बसून त्यांना कायम न्याहाळत राहिलो. आज मात्र बल्लाळेश्वराचा तलाव नावाला उरला आहे, आजुबाजुला उंच, उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. जे आधी शेकडोंनी वेगवेगळे पक्षी दिसायचे ते मुष्कीलीने एखाद दुसरे प्रयासाने शोधायला लागतात. मात्र या जांभळ्या पाणकोंबड्या भरतपूर, नलसरोवर, उरण या ठिकाणी नेहेमी मोठ्या संख्येने दिसतात. भरतपूरला तर काही काही भागात तिथला हिरव्या गवतात यांचे जांभळे रंग आणि कूट्चे काळे रंगच फक्त दिसतात. या वर्षी भिगवणला आम्हाला या जांभळ्या पाणकोंबड्या आणि त्यांची पिल्ले सुद्धा दिसली. प्रौढ जांभळी पाणकोंबडी जेवढी रंगीबेरंगी आई उठावदार तेवढेच ते पिल्लू काळसर आणि राखी रंगाचे असते. अर्थात त्याला तिथल्या गवतात छपण्यासाठी तोच रंग उपयुक्त ठरतो. त्यामुळे याही वेळेला त्या प्रौढ आणि पिल्लांचेही छायाचित्रण करता आले, पण तरीसुद्धा मनामधे तीच पनवलेच्या तळ्यात ठुमकत चालणारी, चालताना आपली आखुड शेपुट वर करून खालचा पांढरा गोंडा दाखवणारी, लाल टिळावाली जांभळी पाणकोंबडी कोरलेली आहे.

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com

1 comment: